सांगलीत देवेंद्र फडणवीस यांनी महापूरहानीची पाहणी केली. यावेळी प्रवीण दरेकर, सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : पश्चिम महाराष्ट्रात वारंवार निर्माण होणारी महापूर स्थिती टाळण्यासाठी कृष्णा-भीमा स्थिरीकरण हाच पर्याय आहे. त्यावर सरकारने विचार करायला हवा, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. सांगलीत महापूर स्थितीच्या पाहणीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते. वडनेरे समितीचा अहवाल शासनाने त्वरित स्वीकारला पाहिजे, असे ते म्हणाले.
यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर, पृथ्वीराज देशमुख, प्राजक्ता कोरे, मकरंद देशपांडे, संग्रामसिंह देशमुख आदी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले की, २०१९ मध्ये कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प जागतिक बँकेपुढे मांडला होता, त्याला तत्त्वत: मान्यताही मिळाली होती. याद्वारे महापुराचे पाणी कालव्यांद्वारे मराठवाड्याकडे वळवता येईल. तेथील दुष्काळ हटेल. महापुराच्या अभ्यासासाठी नेमलेल्या वडनेरे समितीने पूर्ण अभ्यासाअंति अहवाल दिला होता, तो शासनाने स्वीकारला पाहिजे. शिफारशींची अंमलबजावणीही केली पाहिजे. त्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त करावा. पुरामुळे शेतकरी व व्यापारी उद्ध्वस्त झाले आहेत. शासनाने बहाणे न करता तातडीने मदत द्यावी.
ते म्हणाले की, सरकारने केंद्राकडे बोट दाखवणे बंद करावे. तौक्ते वादळात गुजरातमध्ये मोठी हानी झाल्याने तातडीची मदत द्यावी लागली. महाराष्ट्रालाही मिळेल. राज्य शासनाने जबाबदारी टाळू नये. आमच्या सरकारने केंद्राकडे बोटे दाखविली नव्हती.
सांगलीतील महापूर जलसंपदाच्या चुकीमुळेच गंभीर झाला. त्यांनी सांगितलेल्या पातळीपर्यंत लोक निर्धास्त राहिले, प्रत्यक्षात पातळी जास्त झाली, त्यामुळे नुकसानीची तीव्रताही वाढली.
चौकट
गेल्या महापुरात मदत वाटपात गैरव्यवहार नाही
फडणवीस म्हणाले की, २०१९ च्या महापुरात आमच्या सरकारने तातडीची मदत दिली. त्यामध्ये कोणताही गैरव्यवहार झालेला नाही. मदत वाटपाचे लेखापरीक्षण होते, त्यातही गैरव्यवहार दिसलेला नाही. सध्याचे सरकार फक्त बहाणे करत आहे.
चौकट
जयंत पाटील यांना आरोग्य चिंतितो
जयंत पाटील यांची प्रकृती बरी नसल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून समजली. त्यांची प्रकृती बरी व्हावी, त्यांना आरोग्य चिंतितो, अशा शुभेच्छा फडणवीस यांनी दिल्या.