बोरगाव (जि. सांगली) : जिवंतपणी दंतकथा बनून राहिलेल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातील गावगुंडांच्या व खासगी सावकारीविरोधात चाळीस वर्षे रक्तरंजीत लढा देणा-या बापू बिरू वाटेगावकर (रा. बोरगाव, ता. वाळवा, जि. सांगली) यांचे मंगळवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ९६ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर उद्या (बुधवार) दुपारी एक वाजता कृष्णातीरावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
नव्वदीनंतरही तब्येत ठणठणीत, वाणी खणखणीत असणा-या बापू बिरू यांच्यावर पुण्यात जुलैमध्ये सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली होती. त्यातच अन्ननलिकेच्या कर्करोगाने त्यांना ग्रासले होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. ‘कृष्णाकाठचा ढाण्या वाघ’ अशी ओळख असणाºया बापू बिरूंचा जन्म १ जानेवारी १९२२ रोजी झाला. अन्यायाविरोधात पेटून उठून गुन्हेगारी क्षेत्राकडे वळलेले बापू बिरू गरिबांचा ‘रॉबिनहूड’ बनले होते. १९६५च्या दरम्यान बोरगावातील गावगुंडांनी थैमान घातले होते. त्यावेळी अतिशय गरीब परिस्थितीतून पहिलवानकी करणाºया बापू बिरूंनी हातात कुºहाड व बंदूक घेऊन बंड पुकारले. कृष्णाकाठी गोरगरिबांवर अन्याय करणारे खासगी सावकार, तसेच महिलांवर वाईट नजर ठेवणाºया, अत्याचार करणाºया गुंडांविरोधात त्यांनी आवाज उठवला. त्यांनी कित्येकांची कर्जे मुक्त केली. सावकारी पाशात अडकलेल्या जमिनी सोडवून दिल्या. अनेक महिलांचे संसार उभे केले.
‘बापू बिरू’ हे नाव कृष्णा खोºयात घेतले तर गुंड थरथर कापत. या सा-यातून त्यांच्यावर खुनाचे तब्बल १२ गुन्हे दाखल झाले होते. २५ वर्षे ते पोलिसांना गुंगारा देत होते. नंतर त्यांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली. खुनाच्या आरोपात त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. पंधरा वर्षांपूर्वी पुण्याचा येरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगून ते बाहेर आले होते. गावात परतल्यानंतर त्यांनी अध्यात्म आणि धनगर समाजाच्या कार्यासाठी स्वत:ला वाहून घेतले होते. ‘आप्पा महाराज’ या टोपणनावाने ते परिचित होते. माळकरी असल्याने ते भजन, प्रवचनात रमले होते.त्यांच्या जीवन चरित्रावर अनेक पोवाडे, वगनाट्य, चित्रपट बनले आहेत. तमाशासम्राज्ञी मंगला बनसोडे यांचे ‘कृष्णाकाठचा फरारी’ हे वगनाट्य तुफान गाजले. शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांनी रचलेला आणि गायलेला पोवाडाही प्रसिद्ध झाला.परस्त्रीचे अपहरण करणाºया स्वत:च्या मुलालाही संपविलेपरस्त्रीकडे कोणीही वाईट नजरेने पहायचे नाही, हा बापू बिरूंचा दंडक होता. यासाठी वेळप्रसंगी त्यांनी कुºहाड आणि बंदूकही चालवली. त्यांचा थोरला मुलगा तानाजीने परस्त्रीचे अपहरण केल्यावर त्यालासुद्धा त्यांनी गोळी घालून ठार केले.