मिरज : विदर्भात सिंचन व्यवस्थापनाची स्वतंत्र व सक्षम यंत्रणा निर्माण करण्यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत कृष्णा-कोयना उपसा सिंचन मंडल कार्यालय बंद करून, ते यवतमाळ येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. कृष्णा खोरे प्रकल्पाची दोन मंडल कार्यालये विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाकडे स्थलांतरित करण्यात येणार असल्याने, कृष्णा खोरे प्रकल्पाच्या सिंचन योजनांच्या व्यवस्थापनासाठी पाटबंधारे मंडळावर ताण पडणार आहे. जलसंपदा विभागाने दि. १० जून रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार, नागपूर व अमरावती येथे सिंचन क्षमतेचा पूर्ण वापर होण्यासाठी सिंचन व्यवस्थापनासाठी स्वतंत्र व सक्षम यंत्रणेच्या निर्मितीसाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यालयांची फेररचना केली आहे. जलसंपदा विभागाकडे असलेल्या आस्थापनेत फिरवाफिरवी करून विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूरअंतर्गत दोन नवीन सिंचन व्यवस्थापन मंडळांची निर्मिती करण्यात आली आहे. यासाठी कृष्णा-कोयना उपसा सिंचन मंडळ, सांगली हे बांधकाम कार्य प्रकारातील मंडळ कार्यालय सिंचन व्यवस्थापन कार्य प्रकारात रूपांतरित करून यवतमाळ सिंचन मंडळ या नावाने कार्यान्वित करण्यात आले आहे. यामुळे कृष्णा-कोयना उपसा सिंचन मंडळ कार्यालयाच्या नियंत्रणाखाली कार्यरत असलेली संपूर्ण आस्थापना सांगली पाटबंधारे मंडळाच्या नियंत्रणाखाली वर्ग करण्यात आली आहे. कृष्णा-कोयना मंडळाची वर्ग एक व दोनची तांत्रिक आस्थापनाही यवतमाळ मंडलाकडे स्थलांतरित करण्यात आली आहे. कोयना बांधकाम मंडल हे बांधकाम कार्य प्रकारातील कार्यालय सिंचन व्यवस्थापन कार्य प्रकारात रूपांतरित करून सातारा सिंचन मंडळ या नावाने कार्यान्वित करण्यात आले आहे. कृष्णा खोरे प्रकल्पाची दोन मंडल कार्यालये बंद करून ती विदर्भात हलविण्यात येणार आहेत. राज्यातील आणखी तीस विभाग बंद करून विदर्भातील सिंचन व्यवस्थेसाठी स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव आहे. कृष्णा खोरे मंडळाकडील कार्यालये व विभाग बंद करून पाटबंधारे विभागाला जोडण्यात आल्याने पाटबंधारे विभागावर कामाचा मोठा ताण पडणार आहे. पाटबंधारे विभागाच्या उपविभागात अनेक पदे रिक्त असताना, बंद करण्यात आलेल्या कार्यालयांची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. कृष्णा खोरे महामंडळांतर्गत टेंभू, ताकारी, म्हैसाळ सिंचन योजनांची कामे अपूर्ण असताना, येथील कार्यालये व कर्मचारी विदर्भात हलविण्यात आल्याने, सिंचन योजनांची कामे रखडण्याची चिन्हे आहेत. (वार्ताहर)
कृष्णा-कोयना उपसा सिंचन कार्यालय विदर्भात स्थलांतरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2016 11:12 PM