सांगली : शहरात गणरायाचे उत्साहात स्वागत झाले असून यंदाच्या गणेशोत्सवामध्येनदीपात्रात मुर्ती विसर्जन करू नये, यासाठी महापालिकेकडून जनजागृती केली जात आहे. शहरातील कृष्णा नदीत मुर्तीचे विसर्जन केल्याने प्रदुषणात वाढ होणार आहे. त्यात नदीपात्रात पाण्याची पातळी असल्याने विसर्जनाची चिंता लागली आहे. त्यासाठी महापालिकेने कृत्रिम कुंड, तलावाची व्यवस्था केली आहे.गणेशोत्सवाला सुरूवात झाली असून शहरातील सरकारी घाट, विष्णू घाट, स्वामी समर्थ घाट, मिरजेतील कृष्णा घाटावर दीड दिवस, पाचवा, सातवा, नववा आणि अकराव्या दिवशी गणेश मुर्तीचे विसर्जन केले जाते. त्यासाठी महापालिकेने सर्वच घाटांची स्वच्छता केली आहे. घाटावर विसर्जनासाठी मोठी गर्दी होत असते. त्यातच कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी खालावली आहे. नदीपात्रात चार ते पाच फुटच पाणी आहे. त्यामुळे गणेशमुर्तीचे विसर्जन निर्विघ्नपणे पार पाडण्याची चिंता महापालिकेला लागली आहे.प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमुर्ती पाण्यात विरघळत नाहीत. त्यात रासायनिक रंगाचीही वापर केला जातो. अनेकजण नदीच्या पाण्यात निर्माल्य टाकतात. त्यामुळे नदीचे प्रदुषण वाढण्याची भीती आहे. त्यासाठी महापालिकेने गणेश मंडळासह नागरिकांत जनजागृती केली असून विसर्जनासाठी ठिकठिकाणी कृत्रिम कुंड, तलावाची व्यवस्था केली आहे.
सांगलीत कृष्णा नदीचे पात्र पडले कोरडे, महापालिकेला लागली गणेश मुर्ती विसर्जनाची चिंता
By शीतल पाटील | Published: September 19, 2023 7:01 PM