अविनाश कोळी ।
सांगली : उदासीनतेच्या प्रदूषणाने ग्रासलेल्या सरकारी कार्यालयांकडून सार्वजनिक हिताच्या बाबींवर गांभीर्याने पावले उचलली जात नाहीत. तसाच अनुभव कृष्णा नदी स्वच्छतेच्या आराखड्याबाबत येत आहे. नीती आयोगाने आदेश देऊन आता दीड वर्षाहून अधिक काळ लोटला तरी, बृहत आराखड्यास मुहूर्त लागला नाही.
नीती आयोगाने देशातील बारमाही नद्यांच्या प्रदूषणाबद्दल चिंता व्यक्त करून, वर्षापूर्वी स्वच्छतेच्या उपाययोजनांबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अन्य नद्यांबरोबरच कृष्णा नदीबाबत बृहत् आराखडा तयार करण्याचे आदेशही दिले होते. जुलै २०१८ मध्ये याबाबत राज्य शासनाने आदेश दिले होते. अद्याप त्याची अंमलबजावणी नाही.
देशातील चौथी मोठी नदी असलेल्या कृष्णा नदीतील प्रदूषणाने कमाल मर्यादा ओलांडली आहे. याबाबतचा एक अहवाल यापूर्वीच सादर झाला होता. दरवर्षी नदीतील मासे मृत होण्याबरोबरच पाण्यातून होणाऱ्या विविध आजारांच्या संख्येतही वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. पाण्याच्या गुणवत्ता निर्देशांकात सध्या भारताचा १२२ देशांमध्ये १२० वा क्रमांक आहे. ही बाब स्पष्ट करताना नीती आयोगाने नद्या स्वच्छतेच्या उपाययोजनांबाबत सूचना दिल्या होत्या. त्यात कृष्णा नदीचाही समावेश करण्यात आला होता. त्यामुळे राज्य शासनाने याबाबतचा आराखडा तयार करण्याबाबत कृष्णा खोरे विकास महामंडळाचे तत्कालीन उपाध्यक्ष खासदार संजयकाका पाटील यांच्यावर जबाबदारी सोपविली होती. याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही. अहवालाचीच इतकी दप्तरदिरंगाई होत असेल, तर नदी स्वच्छतेच्या उपाययोजनांना किती काळ लागेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सुरुवातीला नदीच्या प्रदूषणाची सद्यस्थिती, कोणकोणत्या प्रकारचे प्रदूषण होते, त्याचे परिणाम, सांडपाणी स्वच्छतेबाबतचे प्रकल्प, त्यांची सद्यस्थिती, एकूणच नदीपात्रातील गेल्या काही वर्षातील बदल, प्रदूषण रोखण्यासाठीच्या आवश्यक उपाययोजना, त्यावरील खर्च, लोकसहभाग, स्थानिक पातळीवरील शासकीय संस्थांचा सहभाग याविषयीचा सविस्तर उल्लेख या अहवालात करावयाचा आहे.
हा अहवाल सादर झाल्यानंतर गंगा, यमुना या नद्यांप्रमाणेच कृष्णा नदी स्वच्छतेचा प्रकल्पही आखण्याचे नियोजन होणार होते. प्रत्यक्षात कृष्णा नदीला प्रदूषणाबरोबर सरकारी उदासीनतेच्या प्रदूषणाचाही सामना करावा लागत आहे.
प्रदूषणाची कमाल
कृष्णा, वारणा नदीपात्रात तब्बल १६० गावांचे दररोज सुमारे ३०.३५ दशलक्ष लिटर सांडपाणी नदीत मिसळत आहे. कृष्णा नदीत सांडपाणी सोडणाऱ्या गावांची संख्या ११० च्या घरात आहे. जिल्ह्यातील १६० गावांमधून जेवढे सांडपाणी दररोज नदीत मिसळते ,त्याहून अधिक सांडपाणी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातून कृष्णा नदीत मिसळते. महापालिका क्षेत्रातून तब्बल ५६.२५ दशलक्ष लिटर सांडपाणी दररोज नदीत मिसळत आहे.
- कृष्णा नदीपात्रातील प्रदूषणामुळे महापालिका क्षेत्रासह नदीकाठच्या गावांमध्ये पाण्यातून होणाऱ्या आजारांचे प्रमाण अधिक आहे. वारंवार याबाबत तक्रारी होत असतात, तरीही त्याची दखल घेतली जात नाही. महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्यांनीही नुकताच एक खासगी प्रयोगशाळेचा अहवाल सादर करून यावर प्रकाशझोत टाकला होता.