अंकलखोप : कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरले असतानाही कृष्णा नदीपात्रातील पाणीपातळी घटत आहे. पाटबंधारे विभागाच्या गैरनियोजनामुळे कृष्णाकाठावरील शेतीसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. शेतीबरोबरच पात्र कोरडे झाल्याने नागरिकांना गढूळ व दूषित पाणीपुरवठा होत असल्याने आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.विक्रमी पावसामुळे यंदा कृष्णा नदीचे पाणी चारवेळा पात्राबाहेर आले होते, तर जुलै व आॅगस्ट महिन्यात महापुराने कृष्णाकाठ उद्ध्वस्त केला होता. त्याच कृष्णा नदीला आज डबक्याचे स्वरूप आले आहे. गावा-गावातील गटारींच्या सांडपाण्यामुळे नदीची गटारगंगा होत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे.पलूस तालुक्यातील अनेक गावांमध्ये नदीपात्र कोरडे पडू लागले आहे. त्यामुळे गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या यंत्रणेसाठीच पाणी नसल्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
आता कोयना धरणातूनच पाणी येत नसल्याने, नदीपात्र कोरडे पडले आहे.नदीतील जलचर प्राण्यांचे जीवनही धोक्यात आले आहे. तसेच मगरी पाण्याबाहेर उघड्या पडल्याचे चित्र काठावर दिसत आहे. गेल्या दोन महिन्यात आलेल्या स्थलांतरित पक्ष्यांचा वावरही कृष्णाकाठावरून कमी झाला आहे.