कुपवाड : कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ इंडस्ट्रीज अँड कॉमर्सची निवडणूक येत्या २० जानेवारीला होणार आहे. यादिवशी सकाळी नऊ ते चारपर्यंत मतदान होणार असून त्याचदिवशी सायंकाळी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अॅड. नंदकुमार मेडशिंगे यांनी पत्रकार बैठकीत दिली.
निवडणुकीचा कार्यक्रम गुरूवारी जाहीर झाला असून निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. संस्थेच्या १२ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. संस्थेच्यावतीने २२० सभासदांना निवडणूक लढविण्यासाठी पात्र ठरविण्यात आले आहे. २७५ सभासदांना मतदानाचा अधिकार आहे.
कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ इंडस्ट्रीज अँड कॉमर्स ही संस्था जिल्ह्यातील उद्योजकांची अग्रगण्य संस्था म्हणून नावारुपास आली आहे. २७ मे रोजी सध्याच्या संचालक मंडळाची मुदत संपली आहे. त्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्या मान्यतेने ही निवडणूक घेतली जात आहे.
२६ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज वितरित केले जाणार असून अखेरची मुदत ३० डिसेंबरपर्यंत आहे. ३१ डिसेंबर ते ६ जानेवारीपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येतील. छाननी ७ जानेवारीला होणार आहे, तर पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी ८ जानेवारीरोजी प्रसिध्द केली जाणार आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत ९ ते ११ जानेवारीपर्यंत आहे. उमेदवारांची अंतिम यादी १३ जानेवारीरोजी प्रसिध्द केली जाणार आहे. २० जानेवारीस मतदान आणि निकाल आहे.
चौकट :
मातब्बरांची तयारी
महिन्याभरापासून मातब्बर उद्योजकांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. निवडणूक बिनविरोध होणार की चुरशीची होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. एमआयडीसीत सध्या उद्योजकांच्या बैठका होऊ लागल्या आहेत.