लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : धरण पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून, नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. गुरुवारी कृष्णा व वारणा नद्या पात्राबाहेर पडल्या आहेत. कडेगाव तालुक्यात येरळा नदीलाही पूर आला आहे. जिल्ह्यात सरासरी ५९, तर शिराळा तालुक्यात १५४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्याच्या सर्व भागात पावसाने हजेरी लावली आहे. गुरुवारी सकाळी नोंदविलेल्या आकडेवारीनुसार, शिराळा तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने येथील वारणा नदी पात्राबाहेर पडली. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर कायम असून, गुरुवारी सायंकाळी पाच वाजता ७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
कडेगाव तालुक्यात येरळा नदीलाही पूर आला आहे. कमळापूर-रामापूर दरम्यानचा पूल पाण्याखाली गेला आहे.
बुधवारी रात्रीपासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला. गुरुवारी सकाळपर्यंत तो कायम होता. काहीवेळ विश्रांती घेत गुरुवारी दुपारी पुन्हा पावसाला सुरुवात झाली. दुष्काळी भागातही मध्यम पाऊस आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आगामी चार दिवस मोठ्या पावसाची चिन्हे आहेत. कृष्णा नदीकाठच्या गावातील ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.
चौकट
हे बंधारे, पूल पाण्याखाली
जिल्ह्यातील कृष्णा नदीवरील पलूस तालुक्यातील आमणापूर पूल, नागठाणे बंधारा तसेच डिग्रज बंधारा पाण्याखाली गेला आहे. यामुळे वाळवा, नागठाणे, शिरगाव, नागराळे या गावांचा संपर्क तुटला आहे. वारणा नदीवरील मांगले-कांदे पूल, ऐतवडे खुर्द-निलेवाडी पूल आणि कणेगाव ते भरतवाडी रस्ता पाण्याखाली गेला आहे. या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. बिळाशी-भेडसगाव पूल पाण्याखाली गेला असून, आरळा-शित्तूर पुलाच्या कठड्याला पाणी लागले आहे. येरळा नदीवरील कमळापूर-रामापूर दरम्यानचा पूल पाण्याखाली गेला. वाळवा तालुक्यात पेठ येथील तिळगंगा ओढ्यात पूरसदृश्य स्थिती झाली असून, या ओढ्यावरील चार पूल पाण्याखाली गेले आहेत.
चाैकट
औदुंबरच्या दत्त मंदिरात पाणी
कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. गुरुवारी दुपारी दोन वाजता औदुंबर (ता. पलूस) येथील दत्त मंदिरामध्ये पाणी शिरले आहे.
चौकट
तालुकानिहाय पाऊस (मि. मी.)
मिरज ३६.२
जत ११.१
खानापूर-विटा २५.२
वाळवा-इस्लामपूर ७५.७
तासगाव ३५.६
शिराळा १५४.३
आटपाडी ७.४
कवठेमहांकाळ १९.८
पलूस ६०.३
कडेगाव ५९.६
चौकट
कृष्णा नदीपातळी (फूट)
बहे १५.३
ताकारी ४३
भिलवडी ३५.९
सांगली आयर्विन पूल २८.३
अंकली २९
म्हैसाळ ३६
चौकट
चोवीस तासांत १४ फूट वाढ
कृष्णा नदीच्या आयर्विन पुलाजवळील पाणी पातळीत चोवीस तासांत १४ फुटांनी वाढ झाली आहे. कोयना धरणातून सध्या २१०० क्युसेक विसर्ग सुरु असून, शुक्रवारी १० हजार क्युसेकने विसर्ग सुरू होणार आहे. त्यामुळे शुक्रवारी नदीच्या पातळीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
चौकट
चांदोलीचे चारही दरवाजे उघडले
रात्री आठ वाजता चांदोली धरणाचे चारही दरवाजे उघडले असून, त्यातून २२ हजार क्युसेकने विसर्ग सुरु आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पातळीत वाढ होऊन पाणी पात्राबाहेर पडले आहे.