सांगली : कृष्णा व पंचगंगा नदीवर २०२१ पर्यंत २२ पूल अस्तित्वात आले. आता नव्याने आणखी पूल उभारले जात आहेत. दोन्ही नद्यांना सतत महापूर येत असताना इतके पूल उभारून जलप्रवाहात अडथळे निर्माण केले जात आहेत. मानव आणि निसर्गाला जोडणारे नव्हे तर त्यांना तोडणारे हे पूल आहेत, असे स्पष्ट मत नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.त्या म्हणाल्या की, कृष्णा व पंचगंगा नदीच्या महापुराचा अभ्यास आम्ही केला होता. केवळ एक अशासकीय संस्था म्हणून आमचा अहवाल तत्कालीन सरकारमधील अधिकाऱ्यांनी स्वीकारला नाही. त्यामुळे आजही महापूर नियंत्रणासाठी संस्थांव्यक्तिरिक्त शासकीय पातळीवर कोणतेही काम होताना दिसत नाही. याउलट आपत्ती वाढविण्यास कारणीभूत असणारे निर्णय घेतले जात आहेत. नदीतील वाळू उपसा, नद्यांवर पूल उभारणी, ओढे, नाले यांच्यात भराव टाकून केले जाणारे रस्ते, नद्यांचे खोलीकरण या सर्व गोष्टी निसर्गचक्र बिघडविण्यास कारणीभूत ठरत आहेत.नदीकाठची निळी व लाल पूररेषा आम्ही नेहमी ऐकत होताे. कोल्हापुरात हिरवी रेषा शोधून काढली गेली. ही दिशाभूल आहे. हरित (ग्रीनफिल्ड) महामार्ग, हरित विमानतळ, हरित प्रकल्प अशा नावाने दिशाभूल करून निसर्गाच्या विपरित कामे केली जात आहेत. अशा विकासकामांच्या माध्यमातून जलस्रोत व नैसर्गिक संपदा नष्ट केली जात आहे.
कृष्णा, पंचगंगा नदीवर एवढे पूल कशासाठी हवेत? - मेधा पाटकर
By अविनाश कोळी | Published: July 10, 2023 5:32 PM