लोकमत न्यूज नेटवर्कशिरोळ : सुरुवातीच्या काळात गणपतराव पाटील यांच्याबरोबर आम्हीही उच्च तंत्रज्ञानावर आधारित ग्रीन हाऊसमधील शेती सुरू केली होती; परंतु सततच्या मार्केटमधील चढ-उतारामुळे शेती करणे थांबविले. मात्र, गणपतराव पाटील यांनी जिद्द, चिकाटी व प्रयोगशिलतेच्या जोरावर या क्षेत्रात नावलौकिक मिळविला आहे. त्यांनी यावरच न थांबता ‘माती विना शेती’ हा प्रयोगही यशस्वी करून दाखविला आहे. त्यामुळेच ते कर्मवीर यांच्या नावे दिल्या जाणाºया पुरस्काराचे खरे मानकरी आहेत, असे गौरवोद्गार आमदार जयंत पाटील यांनी काढले.
सांगली येथील कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट व कर्मवीर सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मवीर पाटील यांच्या जयंतीनिमित्त कृषिभूषण पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी आमदार पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार शरद पाटील होते. यावेळी जयंत पाटील यांच्या हस्ते श्री दत्त कारखाना शिरोळचे अध्यक्ष गणपराव पाटील यांना कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रोख रक्कम ११ हजार, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी पाटील म्हणाले, कर्मवीर भाऊराव आण्णांच्या नावे दिला जाणारा हा पुरस्कार भविष्यात पे्ररणा देणारा ठरणार आहे. याप्रसंगी रावसाहेब पाटील, नरेंद्र खाडे, रमेश ढबू, महेंद्र बागे, आप्पासाहेब लठ्ठे, बापूसाहेब परीट, डॉ. मोटके पाटील, श्रीशैल हेगाण्णा, दिलीप जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. अशोक सकळे यांनी आभार मानले.