फोटो मेल केला आहे..
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : चार इंचाच्या चिखलगाळात रुतलेला सांगलीचा कृष्णाघाट निर्धार फाऊंडेशनच्या मोहिमेमुळे आता मोकळा श्वास घेत आहे. अद्याप याठिकाणी काम सुरू असून गणेशभक्तांना गणेशोत्सवात कोणती अडचण येऊ नये म्हणून फाऊंडेशनचे कार्यकर्ते राबत आहेत.
पूर ओसरल्यानंतर चिखलात रुतल्याने घाटाचा रस्ता व घाट बंद झाल्याबाबत ''लोकमत''ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत फाऊंडेशनने ही मोहीम हाती घेतली.
महापूर ओसरल्यापासून सांगली शहरातील अमरधाम स्मशानभूमी, मगरमच्छ काॅलनी, कर्नाळ रोड, तसेच आजूबाजूच्या पूरबाधित गावांतील मंदिरे, शाळा, रस्ते, स्मशानभूमी आदींची झपाटून स्वच्छता करणाऱ्या राकेश दड्डणावर व टीम घाट परिसर स्वच्छतेसाठी पुढे सरसावली असून सोमवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत स्वच्छता सुरू होती.
महापुराचे पाणी ओसरून आठ दिवस झाले तरी सांगलीतील कृष्णा नदीकाठचा सरकारी घाट, स्वामी समर्थ घाट चिखलमातीत अडकला आहे. नागरिकांमधून स्वच्छतेची मागणी होत होती. महापूर ओसरल्यापासून स्वच्छतेसाठी अग्रभागी असणाऱ्या राकेश दड्डण्णावर व टीमने घाट परिसराची स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. पुढील काही दिवस निर्धार फाऊंडेशनच्या माध्यमातून या परिसराची स्वच्छता मोहीम सुरू राहणार आहे.
राकेश दड्डणावर म्हणाले की, महापूर ओसरल्यापासून अन्य ठिकाणी सातत्याने दिवसभर स्वच्छता सुरू असल्याने आम्हाला नदीकाठी स्वच्छतेसाठी पोहोचण्यासाठी विलंब झाला. ''लोकमत''च्या माध्यमातून आम्हाला सांगलीच्या कृष्णा नदीच्या घाटावरील अस्वच्छतेबाबत कळाले. त्यामुळे आम्ही या परिसराच्या स्वच्छतेला सुरुवात केली आहे. काही दिवस सातत्याने घाटावर स्वच्छता सुरू राहील. सुरुवातीला आम्ही नागरिकांना ये-जा करता यावी म्हणून त्या उद्देशाने प्राधान्यक्रम देऊन काम केले आहे. एरवी आम्ही दोन तास स्वच्छता करायचो, पण सध्या महापुरानंतर दिवसभर स्वच्छता सुरू आहे. नाष्टा व जेवण स्वच्छतेच्या ठिकाणीच सुरू आहे. घाट परिसरानंतर तरुण भारत स्टेडियमची स्वच्छता करण्यात येणार आहे.
मोहिमेत तन्वीर जमादार, सुनील कांबळे, सचिन ठाणेकर, सतीश कट्टीमणी, उमेश पाटील, दीपक कांबळे, प्रथमेश खिलारे, शाम भोरकडे, सहदेव मासाळ, श्रीकांत ढगे, राहुल पवार, रितेश कांबळे, ऋषिकेश तुपलोंढे, रोहित कांबळे, सिद्धार्थ हिप्परकर, सिद्राम कांबळे आदी युवक मेहनत घेत आहेत.