१० संतोष ०४
वाळव्यात मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी कोरोनास्थितीचा आढावा घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : कृष्णा साखर कारखान्याच्या प्रचारासाठी परगावच्या उमेदवारांनी गावात येण्यापूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. गुरुवारी वाळवा तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन त्यांनी कोरोनाचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते.
सर्वाधिक रुग्णसंख्येच्या दहा गावांना त्यांनी भेटी दिल्या. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात फैलाव जास्त आहे. त्यामध्ये वाळवा तालुका आघाडीवर आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी विविध सूचना केल्या व उपाययोजना सांगितल्या, यावेळी गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे उपस्थित होते.
डुडी म्हणाले की, तालुक्यात सध्या कृष्णा कारखाना निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. सर्व उमेदवार व प्रमुख कार्यकर्त्यांनी चाचण्या करून घ्याव्यात. परगावचा उमेदवार गावात प्रचारासाठी येत असेल, तर त्यांनी प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी, मगच प्रचार करावा. उमेदवारांनी सामाजिक भान ठेवून जास्तीत जास्त प्रचार समाजमाध्यमांतून करावा. रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी दक्षता समित्यांनी काटेकोर कार्यवाही करावी. विनामास्क व विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी. कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील लोकांची यादी तपशिलवार बनवावी. प्रत्येक रुग्णामागे किमान १५ जणांची तपासणी केली पाहिजे. पॉझिटिव्ह रुग्णाच्या १०० मीटर परिक्षेत्रातील सर्व व्यक्तींची तपासणी करावी.
डुडी म्हणाले की, रुग्णसंख्या वाढत असली तरी अनेकजण छुप्या रितीने फिरत आहेत. यामुळे अनेक रुग्ण रेकॉर्डवर येतच नाहीत. त्यांचा शोध घेण्यासाठी १०० मीटर परिक्षेत्रातील तपासणी उपयुक्त ठरेल.
खासगी डॉक्टरांकडून प्राप्त होणाऱ्या यादीनुसार संबंधितांची नियमित कोरोना चाचणी करावी. रुग्णाच्या संपर्कातील हाय रिस्क व लो रिस्क नागरिकांचे गृह अलगीकरण काटेकोरपणे करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी. गृह विलगीकरणाची सोय नसल्यास त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवावे, त्यासाठी दक्षता समित्यांची मदत घ्यावी. गृह विलगीकरणातील रुग्णांना मूलभूत गरजा व जीवनावश्यक बाबी ग्रामपंचायत व सेवाभावी संस्थांमार्फत पुरवाव्यात.
चौकट
डुडी म्हणाले की, रुग्णसंख्या जास्त असलेल्या गावांनी स्वत:हून निर्बंध पाळावेत. विनाकारण फिरणाऱ्या व विनाकारण गावात येणाऱ्यांवर नियंत्रण ठेवावे.