अशोक पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या अंतिम मतदार यादीमध्ये अकराशे अक्रियाशील सभासदांचा समावेश नाही. हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले. या सभासदांबद्दलचा निर्णय सहकारमंत्र्यांनी घ्यावा, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या प्रक्रियेचा चेंडू सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कोर्टात गेला आहे.
कारखान्याच्या दोन वर्षांपूूर्वीच्या यादीमध्ये ४९ हजार सभासद आहेत. त्यापैकी २५४५ अक्रियाशील सभासद वजा करता ४६ हजार ४५५ जणांची अंतिम यादी तयार होती; परंतु तक्रारीमुळे त्यात पुन्हा ११०० अक्रियाशील सभासदांचा समावेश करून ४७ हजार ५५५ सभासदांची यादी तयार करण्यात आली. यामध्ये अंदाजे सात हजार मृत सभासद आहेत. त्यामुळे अंतिम यादी ४० हजार ५५५ जणांची आहे. या आकडेवारीचा गोंधळ न्यायालयात गेला. याचा निर्णय सहकारमंत्र्यांनी घ्यावा, असे आदेश न्यायालयाने दिले. मात्र, तिन्ही पॅनलकडून वेगवेगळी आकडेवारी सांगितली जात आहे. या गोंधळामुळे निवडणूक पुढे जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, याबाबतचा निर्णय सहकारमंत्री बाळासाहेब पाटील गुरुवार, दि. २० रोजी देणार असल्याचे समजते.
गेल्या दोन वर्षांपासून ११०० अक्रियाशील सभासदांचा घोळ चालू आहे. कोरोनामुळे या सभासदांना न्यायालयात जाता आले नाही. आता निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्याने त्यांना न्याय मिळावा म्हणून हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले. त्यांचा निर्णय झाल्यानंतरच निवडणूक प्रक्रियेला गती येईल, असे जाणकारांचे मत आहे. एकीकडे यादीचा गोंधळ आहे, तर दुसरीकडे सहकार पॅनलचे प्रमुख डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले, रयत पॅनल प्रमुख डॉ. इंद्रजित मोहिते आणि संस्थापक पॅनलचे प्रमुख अविनाश मोहिते यांनी उमेदवार निवडीसाठी चाचपणी सुरू केली आहे.
चौकट
आकडेवारीचा मेळ लागेना
पॅनल प्रमुखांकडून सभासदांच्या अंतिम यादीतील वेगवेगळी आकडेवारी सांगण्यात येत आहेत. प्रमुखांनाच आकडेवारीचा मेळ लागलेला नाही. मात्र, सभासद मतदानासाठी तयारीत बसले आहेत.