इस्लामपूर : सातारा, सांगली जिल्ह्यांत कोरोनाच्या प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याचा विचार करून यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची येणारी निवडणूक पुढे ढकलावी, अशी मागणी कारखान्याचे सभासद अनिल भीमराव पाटील (रा. कामेरी, ता. वाळवा) यांनी सातारा व सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
त्यांनी म्हटले आहे की, कोरोनाची दुसरी लाट पसरत आहे. यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक न्यायालयाच्या आदेशाने होत आहे. परंतु, सातारा आणि सांगली जिल्ह्यांत कोरोनाच्या लाटेने उत्पात मांडला आहे. या उद्रेकीय परिस्थितीचा विचार करता ही निवडणूक सभासदांच्या हितासाठी पुढे ढकलावी, अशी मागणी निवेदनाद्वारे पाटील यांनी केली आहे. हे निवेदन उच्च न्यायालय, सहकार आयुक्त यांना देण्यात आले आहे.