लोकमत न्यूज नेटवर्क
शिरटे : रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक फेब्रुवारीअखेर किंवा मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात होणार असल्याने चर्चेला उधाण आले आहे. निवडणूक कधी होणार याबाबत अजूनही संदिग्धता असली तरी, कृष्णाकाठावरच्या कार्यकर्त्यांतून, कोणता झेंडा घेऊ हाती? याचीच चर्चा सुरू झाली आहे. या निवडणुकीने राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.
‘कृष्णा’ची निवडणूक ही संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेत असते. सध्या तरी विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांचे सहकार पॅनेल, माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांचे रयत, तर माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक अविनाश मोहिते यांचे संस्थापक पॅनेल यांच्यात तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र आहे. आगामी काळात कोणा-कोणाचे मनोमीलन होणार, की प्रत्येकजण स्वतंत्र लढणार, हे लवकरच समजेल.
सांगली व सातारा जिल्ह्यात कार्यक्षेत्र असलेल्या कृष्णा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जलसंपदामंत्री जयंत पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्यासह आजी-माजी खासदार व आमदारांची मांदियाळी आहे.
विद्यमान भोसले गट हा भाजपला, डॉ. इंद्रजित मोहिते काँग्रेसला, तर अविनाश मोहिते हे राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारे आहेत. त्यामुळे ‘कृष्णा’च्या रणांगणावर पक्षीय झेंडे फडकणार का? हे अजून गुलदस्त्यात आहे. निवडणूक कधी होणार याबाबत अजूनही निश्चितता नाही. तरीही डॉ. इंद्रजित मोहिते यांनी कऱ्हाड तालुक्यात संपर्क दौरा सुरु केला आहे. अविनाश मोहिते यांनी यापूर्वीच एक दौरा पूर्ण केला आहे, तर डॉ. भोसले यांनी कोरोनाच्या संकटकाळात कृष्णा चॅरिटेबलच्या माध्यमातून रुग्णांची केलेली सेवा आजही चर्चेत आहे. सध्या तरी निवडणूक मार्चच्या आत होणार, अशी चर्चा कृष्णाकाठावरती जोर धरू लागली आहे.
चौकट
मनोमीलन होणार का?
कऱ्हाड तालुक्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी मंत्री विलासकाका उंडाळकर यांच्यात झालेल्या मनोमीलनाची चर्चा आहे. त्यामुळे या मनोमीलनचे परिणाम ‘कृष्णा’च्या निवडणूक पटलावरती काय होणार, हे येत्या काही दिवसात समजेल.
फोटो डॉ. सुरेश भोसले, डॉ.इंद्रजित मोहिते, अविनाश मोहिते