विटा : विटा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी गटाचे नेते माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे व एकेकाळच्या विकास आघाडीचे नेते अशोकराव गायकवाड यांचे बंधू माजी नगरसेवक कृष्णत गायकवाड यांनी विद्यमान आमदार अनिल बाबर यांना नगरपालिका निवडणुकीसाठी पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे अशोकराव गायकवाड यांच्या घरातच फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले असून, सत्ताधारी पाटील गटालाही धक्का बसला आहे.नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत माजी आमदार पाटील यांच्याविरोधात परिवर्तनासाठी बाबर यांच्यासह समर्थकांनी मोठी तयारी चालविली आहे. त्यातच माजी आमदार पाटील यांचे समर्थक कृष्णत गायकवाड यांनी पाठिंबा जाहीर केल्याने बाबर गटाला मोठी ताकद मिळाली आहे. विटा येथे रविवारी कृष्णत गायकवाड यांनी अनिल बाबर यांच्या गटात प्रवेश केला. बाबर यांनी गायकवाड यांचे स्वागत केले.यावेळी बाबर म्हणाले, कृष्णत गायकवाड यांच्या पाठिंब्यामुळे नगरपालिकेत परिवर्तन अटळ आहे. सर्वसामान्य जनतेत मिसळून काम करणारे ते नेते आहेत. त्यांनी घेतलेल्या भूमिकेला शक्तिमान करण्याचे काम आम्ही करू.
सुहास बाबर म्हणाले, कृष्णत गायकवाड यांच्या प्रवेशामुळे आमची अनेक वर्षांची मागणी श्री नाथबाबांनी पूर्ण केली आहे. आमदार अनिल बाबर यांनी विटा शहरासाठी विकासात्मक धोरण राबविले. कृष्णत गायकवाड यांचा आदेश मानून यापुढे निवडणुकीची मोर्चेबांधणी करून सत्तांतर घडवू.यावेळी सुखदेव शितोळे, नंदकुमार पाटील, मिलिंद कदम, शरद शहा, अशोक कदम, रामचंद्र भिंगारदेवे, शरद बाबर, प्रकाश भिंगारदेवे, संजय भिंगारदेवे, कुमार लोटके, सुरेश पाटील, प्रवण हारूगडे, उत्तम चोथे, रमेश शितोळे, राजू मुल्ला, अमोल मंडले, सुशांत मेटकरी, अनिल हराळे, दत्तात्रय गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
अनिलभाऊंच्या कामांमुळे प्रभावित...आमदार अनिल बाबर यांनी विटा शहरासाठी मोठी विकासकामे केली आहेत. सर्वांना सोबत घेऊन जाण्याबरोबरच कार्यकर्त्यांना योग्य सन्मान देण्याचे काम ते करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या कामांवर प्रभावित होऊन आणि यावेळी विटा नगरपालिकेत परिवर्तन घडविण्यासाठी बाबर यांना पाठिंबा दिला असल्याचे कृष्णत गायकवाड यांनी सांगितले.