कवठेमहांकाळ : तालुक्यातील करोली (टी) येथे चार वर्षाच्या बालकाला पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला करून ठार केले. ही घटना मंगळवारी सकाळी साडेसात वाजता घडली. बाबासाहेब राजाराम जगताप असे या बालकाचे नाव असून, या घटनेने करोली परिसरात खळबळ माजली आहे.करोली (टी) येथील जगताप वस्तीवर राजाराम पाटील यांचे कुटुंब राहते. मंगळवारी सकाळी घरातील सगळी माणसे शेतातील ज्वारी काढायला गेली होती. त्यावेळी राजाराम पाटील यांचा चार वर्षांचा मुलगा बाबसाहेब घरी झोपला होता. घराचे दार बंद केले होते, परंतु कडी लावली नव्हती. साडेसात वाजण्याच्या सुमारास एक पिसाळलेले कुत्रे पाटील यांच्या घरात शिरले आणि त्याने झोपलेल्या बाबासाहेबवर प्राणघातक हल्ला केला. कुत्र्याने त्याच्या मानेला धरून त्याला फरफटत बाहेर आणले व हल्ला करीत घराच्या मागे नेले. तेथे त्याच्या डोक्यावर, मानेवर, नरड्याला जोरदार चावा घेतला. हे त्याच्या आईने पाहताच पिसाळलेल्या कुत्र्याच्या तोंडातून मुलाला सोडवून घेतले. त्याच्या आईच्या हातालाही कुत्र्याने गंभीर चावा घेतला.गंभीर जखमी झालेल्या बाबासाहेबला कवठेमहांकाळ येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची बातमी वाऱ्यासारखी वस्तीवर पसरली. चिडलेल्या जमावाने कुत्र्याला ठार मारले.
करोली टीमध्ये कुत्र्याच्या हल्ल्यात बालक ठार
By admin | Published: March 22, 2017 12:13 AM