लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कुमठे (ता. तासगाव) येथील मिलिंद जोशी यांच्या कुटुंबातील तब्बल सहाजण बाधित झाले. डॉक्टर, प्रशासन व गावकऱ्यांनी केलेले सहकार्य व सकारात्मक मानसिकतेच्या जोरावर या कुटुंबाने कोरोनावर यशस्वी मात केली.
मिलिंद जोशी यांना १८ मार्च २०२१ रोजी कोरोनाबाधित असल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी कुटुंबीयांची तपासणी केली. त्यात सहाजण बाधित झाल्याची बाब समोर आली. त्यामुळे चिंता करण्याऐवजी जोशी कुटुंबाने याचा धैर्याने सामना केला. लक्षणे सौम्य असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी, तसेच फॅमिली डॉक्टर अजय जोशी व डॉक्टर सुनील पाटील यांनी गृह विलगीकरणाचा त्यांना सल्ला दिला. आरोग्य रक्षकांच्या सल्ल्यानुसार त्यांनी घरीच वैद्यकीय सल्ल्याने औषधोपचार व आहार घेतला. सर्वांच्या सहकार्याने त्यांनी धीराने परिस्थितीचा सामना केला आणि अल्पावधित त्यावर मात करून समाजाला आरोग्याचा मंत्र दिला.
कोट
प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत कुमठे यांनी योग्य ती काळजी घेताना तत्पर वैद्यकीय व दैनंदिन गरजा पुरविल्या. आमची कोरोनाशी लढाई ही आम्ही सर्व गावकरी, शासकीय यंत्रणा यांच्या सोबतीने लढून जिंकली.
- मिलिंद विठ्ठल जोशी, सदस्य
कोट
घरातल्या सदस्यांना कोरोना झाल्याचे समजल्यानंतर आम्ही न खचता वैद्यकीय उपचार व सकस आहार घेतला. गावातील लोकांनीही सहकार्य केले. त्यामुळे आम्ही यातून बाहेर पडलो. अन्य बाधितांनीही सकारात्मकतेने सामना करावा.
- उदय विठ्ठल जोशी, कुटुंब प्रमुख
कोट
योग्य उपचार व विलगीकरणाचे पथ्य पाळले तर कोरोनावर मात करता येते. त्यासाठी बाधितांनी न खचता याचा सामना करावा. कुटुंबीय म्हणून आम्ही सर्व सकारात्मकतेने सामोरे गेलो आणि यावर मात केली. - धनश्री उदय जोशी, कोरोनामुक्त
कोट
हा असाध्य आजार नसून योग्य ती काळजी व योग्यवेळी योग्य उपचार, तसेच सकारात्मक मानसिकतेने कोरोनावर सहज मात करता येते. आम्ही कोरोनावर विजय मिळविला. संपूर्ण देश ही लवकरच यातून बाहेर पडेल.
- विवेक उदय जोशी, कुटुंब सदस्य