सांगली : महसूल विभागाकडून कुणबी मराठा, मराठा कुणबी नोंदीबाबत जिल्ह्यात दि. ८ नोव्हेंबरअखेर दहा लाख सहा हजार ६५५ दस्ताऐवजांची तपासणी केली आहे. यामध्ये मराठी आणि मोडी लिपीत दोन हजार २११ नोंदी आढळून आल्या आहेत. यापुढेही बारा विभागांकडून नोंदींची तपासणीची मोहीम चालूच असणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.डॉ. राजा दयानिधी म्हणाले, जिल्ह्यात कुणबी मराठा, मराठा कुणबी नोंदी तपासणीचे काम मिशन मोडवर हाती घेतले आहे. यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर विशेष कक्षाची स्थापना केली आहे. या विशेष कक्षांमार्फत दि. ८ नोव्हेंबरअखेर दहा लाख सहा हजार ६५५ दस्तावेजांची तपासणी केली. तपासणीमध्ये दस्तावेजातून दोन हजार २११ कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. यामध्ये मराठी भाषेतील दोन हजार १५७ व मोडी लिपीतील ५४ नोंदींचा समावेश आहे. यामध्ये मिरज तालुक्यात चार लाख २५ हजार ५१८ नोंदींची तपासणी केली आहे. यामध्ये १८३ कुणबी मराठा नोंदी आढळून आल्या. तासगाव तालुक्यात दोन लाख पाच हजार ७८४ दस्तऐवजाची तपासणी केली असून, कुणबीच्या ५४६ नोंदी आढळून आल्या.
कवठेमहांकाळ तालुक्यात ५० हजार ९७७ दस्तऐवजाची तपासणीमध्ये कुणबीच्या ४१ नोंदी आढळून आल्या. जत तालुक्यात तीन हजार २०५ दस्तऐवजाची तपासणी केली असून, कुणबी नोंदी आढळून आल्या नाहीत. खानापूर तालुक्यात ७७ हजार ५३७ दस्तऐवजाची तपासली असून कुणबीच्या १६ नोंदी आढळून आल्या. आटपाडी तालुक्यात २७ हजार ८०३ दस्तऐवजाची तपासणी केली असून, कुणबी नोंदी आढळून आल्या नाहीत.
कडेगाव तालुक्यात २२ हजार ३८१ दस्तऐवजाची तपासणीत १३ कुणबीच्या नोंदी आढळून आल्या. पलूस तालुक्यात ४१ हजार ५६२ दस्तऐवजाची तपासणीमध्ये तीन कुणबीच्या नोंदी आढळून आल्या. वाळवा तालुक्यात ७५ हजार ४१६ दस्तऐवजाची तपासणीत कुणबीच्या ६०५ नोंदी आढळून आल्या. शिराळा तालुक्यात एक हजार ७२३ दस्तऐवज तपासणीत कुणबीच्या ८०४ नोंदी आढळून आल्या आहेत. अपर तहसील सांगलीमध्ये ७४ हजार ७४९ दस्तऐवजाची तपासणी केली असता कुणबी नोंदी आढळून आल्या नाहीत.
तीन तालुक्यात नोंदीच नाहीतजत, आटपाडी आणि अप्पर तहसील सांगलीमध्ये जवळपास एक लाखांवर दस्तऐवजांची प्रशासनाने तपासणी केली आहे. या तपासणीमध्ये एकाही दस्तऐवजामध्ये कुणबी मराठा अथवा मराठा कुणबी अशा नोंदी आढळून आल्या नाहीत, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.