जत : ‘धनगर समाजास आरक्षण मिळावे’, अशी चिठ्ठी लिहून ठेवत कुणीकाेणूर (ता. जत) खालील आबाचीवाडी येथील बिरू वसंत खर्जे (वय ३८) यांनी घरासमोरील शेतातील झाडास दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवार, दि.२२ राेजी सायंकाळी ६ वाजता खर्जे वस्ती येथे घडली.बिरू खर्जे यांची आबाचीवाडी येथे बारा एकर शेती आहे. आई, वडील, पत्नी, मुलगा, दाेन मुली, भाऊ व त्याचे कुटुंब, असे सर्व जण एकत्र राहतात. रविवारी सायंकाळी त्यांनी शेतातील झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार लक्षात येताच घटनेची माहिती जत पाेलिसांना देण्यात आली. तात्काळ पाेलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जत ग्रामीण रुग्णालायत पाठविण्यात आला.गळफास घेण्यापूर्वी खर्जे यांनी लिहिलेली चिठ्ठी पाेलिसांना मिळाली आहे. यामध्ये ‘धनगर आरक्षणप्रश्नी मी जीवनयात्रा संपवत आहे. माझ्या पश्चात नातेवाइकांना त्रास देऊ नये’, असा उल्लेख केला आहे.रात्री उशिरापर्यंत जत पाेलिस ठाण्यात घटनेची नाेंद घेण्याचे काम सुरू हाेते. आरक्षणाबाबत जत तालुक्यातील शेतकऱ्याने आत्महत्या केली असल्याचे समजताच तालुक्यात खळबळ उडाली आहे.
पडळकरांचा मेळावा पाहून घेतला गळफास?रविवारी दुपारी गोपीचंद पडळकर यांचा आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे दसरा मेळावा हाेता. हा कार्यक्रम त्यांनी माेबाइलवर ऑनलाइन पहिला. आरक्षणाबाबत पडळकर यांचे भाषण ऐकून ते व्यथित झाले. यानंतर वहीच्या एका कागदावर पेन्सिलने ‘धनगर समाजास आरक्षण मिळावे, यासाठी मी आत्महत्या करत आहे.’ अशी चिठ्ठी लिहून त्यांनी जवळच शेतात असलेल्या झाडाला दाेरीने गळफास घेतल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे.