महालिंग सलगर- कुपवाड -सांगली, मिरजेला क्रीडांगणे व उद्यानांची रेलचेल असताना, कुपवाड शहर व उपनगरे मात्र क्रीडांगणासह उद्यानांपासून वंचित आहेत़ या सुविधा नसल्याने शहरातील लहान मुले व खेळाडूंचा विकासच खुंटला आहे़ त्यांनी शाळांच्या छोट्या मैदानांचा आधार घेऊन राष्ट्रीय व राज्यपातळीपर्यंत मजल मारली आहे़ महापालिका प्रशासन मात्र जागे होताना दिसत नाही़ महापालिकेने मोकळ्या जागा विकसित करून सुसज्ज क्रीडांगणे किंवा उद्याने तयार करावीत, अशी मागणी होत आहे़महापालिकेत समाविष्ट असलेल्या कुपवाड शहराच्या तिन्ही बाजूला औद्योगिक वसाहती आहेत़ कुपवाड एमआयडीसी, मिरज एमआयडीसी, वसंतदादा औद्योगिक वसाहत आणि संजय इंडस्ट्रीयल इस्टेट या औद्योगिक वसाहती कार्यरत आहेत़ त्यामुळे या शहराकडे कामगारवर्ग जास्त प्रमाणात आकर्षित झाला़ हा कामगारवर्ग येथे रहिवासास आल्यामुळे शहरासह उपनगरांची लोकसंख्या हळूहळू वाढू लागली़ कामगारवर्ग सर्वसामान्य वर्गामध्ये मोडत असल्यामुळे जागा मिळेल त्याठिकाणी त्यांच्या वसाहतीही निर्माण झाल्या़ त्यामुळेच महापालिका क्षेत्रातील सर्वात जास्त गुंठेवारी कुपवाड शहरात आहे़ ग्रामपंचायत असताना या शहराची लोकसंख्या ११ हजारावर होती़ ती आता ६५ हजारावर जाऊन पोहोचली आहे़ या वाढलेल्या लोकसंख्येसाठी परिसराचा विकासही होणे गरजेचे होते, परंतु म्हणावा तसा विकास आजपर्यंत झालेला नाही़ बालकांसाठी, तरुणाईसाठी गरजेचे असलेले क्रीडांगण आणि अबाल-वृध्दांसाठी उद्याने उभारणे गरजेचे होते़ ती उभारणे महापालिकेच्या स्थापनेनंतर आजतागायत प्रशासन अथवा लोकप्रतिनिधींना जमलेले नाही. कुपवाड शहरासह उपनगरांतील लहान मुले व तरुण खेळाडंूनी क्रीडांगणे व उद्याने नसतानाही, शाळांच्या मैदानांचा वापर करून राज्य व राष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारली आहे़ शहरात ही सुविधा नसली तरीही शिवप्रेमी व राणाप्रताप संघांनी खो-खोच्या महापौर चषकासह अनेक राज्यपातळीवरील स्पर्धा भरविल्या़ त्यातून प्रेरणा घेऊन खो-खोमध्ये शहरात सव्वाशेहून अधिक खेळाडू घडले़ ही प्रशासनाच्या उदासीन धोरणाला चपराकच म्हणावी लागेल़ महापालिकेने शहरासह उपनगरात जागा विकत घेऊन किंवा मोकळ्या जागेत सुसज्ज क्रीडांगण निर्माण करावे, महावीर उद्यानासारखे भव्य उद्यान उभारावे, अशी मागणी होत आहे़
कुपवाडला चिमुरड्यांनी, खेळाडूंनी बागडायचे कोठे ?
By admin | Published: January 10, 2015 12:04 AM