कुपवाड : कुपवाड एमआयडीसीलगत पक्षी मृत झाल्याचे आढळून आल्यानंतर बर्ड फ्लूच्या संशयाने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. संबंधित ठिकाणास केंद्रबिंदू मानून १० किलोमीटर त्रिज्येतील चिकन दुकाने व चायनीज सेंटर आणि चिकन ६५ हे व्यवसाय प्रशासनाने बंद करावेत, अशी मागणी आहे.
राज्यात काही ठिकाणी बर्ड फ्लू आजाराने कोंबड्या व इतर पक्षी दगावल्याचे आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासन सतर्क झाले आहे. अशातच सावळी हद्दीतील एका कंपनीच्या आवारात पक्षी मृत झाल्याचे आढळून आले. त्यामुळे कुपवाड, सावळी, बामणोली, कानडवाडी, तानंग, मानमोडी परिसरांतील नागरिक व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या ठिकाणी पक्षी मृत्युमुखी पडल्याचे आढळल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत.
यामध्ये त्यांनी मृत पक्षी आढळून आलेल्या ठिकाणास केंद्रबिंदू मानून १० किलोमीटर त्रिज्येतील परिसरामध्ये कुक्कुटपक्ष्यांची, पक्षीखाद्यांची, अंडी खरेदी, विक्री, वाहतूक, बाजार व जत्रा, प्रदर्शन आयोजित करण्यास प्रतिबंध घातला आहे. सावळी हे गाव ‘अलर्ट झोन’ म्हणून घोषित करण्यात आले आहे.
या पक्ष्यांच्या मृत्यूच्या कारणाचे निष्कर्ष येणे अद्याप बाकी आहे. कुपवाड शहरासह विस्तारित परिसरात अनेक ठिकाणी चिकन दुकाने, चायनीज सेंटर, चिकन ६५ खाद्यपदार्थ व्यवसायाचे हातगाडे आहेत. हे व्यवसाय जिल्हा प्रशासनाने अहवाल येईलपर्यंत बंद करावेत. बर्ड फ्लूने मृत्यू झाल्याचा अहवाल आल्यास आणि यातून अनर्थ घडल्यास होणाऱ्या धोक्यास जबाबदार कोण, असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे. हा अनर्थ टाळण्यासाठी पोलीस व जिल्हा प्रशासन यांनी संयुक्तपणे मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.