कुपवाड : एका रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराने शहरातील राजेंद्र बसगोंडा पाटील या व्यापाऱ्याच्या घरात घुसून साहित्याचे नुकसान व शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना शनिवारी रात्री घडली. तसेच त्याने दुचाकी जाळून ६५ हजार रुपयांचे नुकसान केले.
याप्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयित सन्या ऊर्फ शुभम पारसमल जैन (वय २५, रा. कुपवाड ) याला कुपवाड पोलिसांनी अटक केली आहे.
कुपवाडमध्ये एका रुग्णालयाशेजारी पाटील यांचे घर आहे. शनिवारी रात्री सराईत गुन्हेगार सन्या ऊर्फ शुभम जैन याने त्यांच्या शेजारी राहणारे व्यापारी बसगोंडा पाटील यांच्या नवीन घरात गेटवरून उडी मारली. त्यानंतर घरात घुसून फर्निचरची तोडफोड केली. यावेळी पाटील यांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न करताच, शिवीगाळ करून त्यांना ठार मारण्याची धमकी त्याने दिली. यानंतर जैन याने घरातील टीव्ही, कुलर, संगणकाची तोडफोड केली. कपाटाच्या काचा फोडून आर्थिक नुकसान केले. तसेच रस्त्यावर उभी केलेली दुचाकी (क्र. एमएच १० बीएल ७६८६) पेटवून ६५ हजार रुपयांचे नुकसान केल्याची तक्रार पाटील यांनी कुपवाड पोलिसात दाखल केली. पोलिसांनी मध्यरात्री संशयित सन्या जैन याला अटक केली. रविवारी सकाळी पोलिसांनी त्याला न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.