लोकमत न्यूज नेटवर्क
कुपवाड : कुपवाड ड्रेनेज योजनेला गती देण्यासाठी प्रयत्न सुरू असून त्यासंबंधीत प्रकल्प लवकरच सुरू होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. बालाजीनगर गृहनिर्माण हौसिंग सोसायटीतील टेनिस कोर्टच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
कुपवाड येथील प्रभाग क्रमांक एकमध्ये वसलेल्या बालाजीनगर गृहनिर्माण हौसिंग सोसायटीमध्ये अध्यक्षा चित्रा पंडियन यांनी वसविलेल्या इंथेटिक टेनिस कोर्टचे उद्घाटन पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते झाले. महापौर दिग्विजय सूर्यवंशी, उपमहापौर उमेश पाटील, माजी उपमहापौर प्रशांत पाटील, नगरसेवक विष्णू माने, पृथ्वीराज पाटील, दिगंबर जाधव, बजरंग पाटील, राहुल पवार, मुस्ताक रंगरेज, भालचंद्र मोकाशी उपस्थित होते.
संतोष पाटील म्हणाले, सोसायटीचे संपूर्ण काम हे लोकसहभागातून चालते, सातत्याचे स्तुत्य उपक्रम पाहून महापालिका प्रशासनाकडून नेहमी सोसायटीचा गौरव होतो. सध्या सोसायटीला सांस्कृतिक भवन, विद्युतीकरण आणि विहिरींना सुरक्षित कुंपणाची गरज आहे.
मंत्री जयंत पाटील म्हणाले, अध्यक्षा चित्रा पंडियन यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या इंथेटिक टेनिस कोर्टचा उपयोग अनेकांना होणार आहे. शहरात खेळाची आवश्यकता भासत आहे. ही बाब जाणून छत्रपती शिवाजी क्रीडांगणाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. क्रीडांगण उत्कृष्ट तयार होणार आहे.
कुपवाड ड्रेनेज योजनेबाबत ते म्हणाले, योजनेला गती देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच प्रकल्प सुरू होईल. सांगली-मिरज हे दोन प्रकल्प अपूर्ण असल्याने थोडी अडचण निर्माण झाली होती. परंतु मुंबई येथील बैठकीत ती दूर करण्यात आली आहे. लवकरच प्रकल्प सुरू करण्यात येईल.