कुपवाड : कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील एका उद्योजकाला बेंगलोर येथे मोक्याच्या ठिकाणी दोन कोटी रुपयांची जागा देतो, असे म्हणून त्याची एक कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या कर्नाटकातील एका सराईत गुन्हेगाराला कुपवाड पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने धारवाड येथे अटक केली. मोहन डोंगरसा वाळवेकर (वय ६२, रा. धारवाड, कर्नाटक) असे संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कुपवाड एमआयडीसीतील एका उद्योजकाला बेंगलोर येथे मोक्याच्या ठिकाणी दोन कोटी रुपयांची जागा देतो, म्हणून संशयित मोहन वाळवेकर याने २०१५ मध्ये वेळोवेळी असे एक कोटी रुपये घेतले होते. वाळवेकर याने फिर्यादीस नोटरी व पत्नी ममता हिच्या बँक खात्याचे पाच कोरे धनादेश दिले होते. फिर्यादीने जागा खरेदीबाबत वेळोवेळी विचारणा केली असता, जागेत अडथळा निर्माण झालेला आहे, त्यामुळे जागा देता येत नाही, असे सांगत त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली.
त्यामुळे उद्योजकाने कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित वाळवेकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे हवालदार प्रवीण यादव, नितीन मोरे, कृष्णा गोंजारी यांनी त्याला कर्नाटकातील धारवाड येथे ताब्यात घेऊन कुपवाड पोलीस ठाण्यात आणले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती तपास अधिकाºयांनी दिली. संशयित मोहन वाळवेकर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात महाराष्ट्र, कर्नाटकातील पोलीस ठाण्यात अनेक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली.कुपवाड एमआयडीसीतील उद्योजकाची एक कोटीची फसवणूक करणाºया मोहन वाळवेकर याला बुधवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले.