कुपवाड : कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील कानडवाडी रस्त्यावरील एम. एस. ट्रेडर्सचे बेदाणा व्यापारी कादरवली हुसेनसाहेब नागूर (वय ४५, रा. शिवाजीनगर, सांगली) यांची तामिळनाडूतील पाच व्यापाऱ्यांनी ८ कोटी ४४ लाख ३५ हजार ३२९ रुपयांची फसवणूक केली.
बेदाणा नेऊन फसवणूक केल्याचा गुन्हा नागूर यांनी सोमवारी रात्री उशिरा कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितामध्ये बावाजीसाहेब, जी. नूरजहाँ, जी. सत्तार, आर. मोगम व उत्थयकुमार रजनेथी पांडियन यांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कादरवली नागूर यांच्या मालकीच्या एम.एस. ट्रेडर्स या फर्ममधून २०१६ ते सप्टेंबर २०२० अखेर संशयित बावाजी, जी. नूरजहाँ व जी. सत्तार यांनी ६ कोटी १२ लाख ९१ हजार ४७ रुपयांच्या बेदाण्याचे बॉक्स खरेदी करून नेले होते. तसेच आर. मोगम व उत्थयकुमार पांडीयन यांनी २ कोटी ३१ लाख ४४ हजार २८२ रुपयांचा बेदाणा खरेदी करून नेला होता. या पाच व्यापाऱ्यांनी नागूर यांना रक्कम देण्यास टाळाटाळ सुरू केली. फसवणूक केल्याचे लक्षात येताच नागूर यांनी सोमवारी रात्री संशयित पाच व्यापाऱ्यांविरोधात फसवणूक केल्याचा गुन्हा कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे तपास करीत आहेत.