फोटो ओळ : शहरातील सोसायटी चौकात व्यापारी संघटनेच्या वतीने शासनाच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुपवाड : शासनाने जाहीर केलेल्या मिनी लॉकडाऊन अंमलबजावणीच्या निषेधार्थ कुपवाडमधील व्यापारी संघटनेच्या वतीने बुधवारी सोसायटी चौकात बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. यावेळी व्यापाऱ्यांनी शासन आणि महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली.
शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिनी लॉकडाऊन जाहीर केले आहे. जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासनाने महापालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाला विरोध म्हणून बुधवारी सकाळी कुपवाड व्यापारी संघटनेच्या वतीने मुख्य सोसायटी चौकात फुटपाथवर बसून बोंबाबोंब आंदोलन करून निदर्शने करण्यात आली.
व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अमर दीडवळ, उपाध्यक्ष बीरू आस्की, माजी अध्यक्ष अनिल कवठेकर, राजेंद्र पवार यांनी शासनाचा हा निर्णय चुकीचा असून छोटे व्यापारी व व्यावसायिक देशोधडीला लागतील. महापालिका प्रशासनाने हा निर्णय त्वरित मागे न घेतल्यास शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. व्यापारी संघटनेच्या वतीने गुरुवारी सकाळी थाळीनाद आंदोलन केले जाणार आहे.