कुपवाड : मणेराजुरी (ता. तासगाव) येथील योगेश जगन्नाथ वाघमारे (वय २९) या तरुणास रविवारी प्लाॅट दाखविण्याचा बहाणा करून बंदूक व कोयत्याचा धाक दाखवून चार संशयितांनी लुटले. या घटनेत मोबाइल व रोख रक्कम असे २८ हजार रुपयांची लुटमार संशयितांनी केली आहे. याप्रकरणी कुपवाड पोलिसांनी चाैघा अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
रविवारी सकाळी फिर्यादी योगेश वाघमारे यांना एका अज्ञाताने फोन करून प्लाॅट दाखवतो असे म्हणून कुपवाड-मिरज रस्त्यालगत असलेल्या गुलमोहर काॅलनीजवळ बोलावून घेतले. वाघमारे गुलमोहर काॅलनीजवळ आल्यावर चार अज्ञात व्यक्ती माेटारीतून तेथे आल्या. वाघमारे यांना ‘तुम्हाला प्लाॅट दाखवतो’ असे म्हणून मोकळ्या रानात घेऊन गेले. यातील दोघांनी वाहनातून आणलेल्या बंदूक व कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्या जवळचा मोबाइल आणि रोख रक्कम असा २८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेची नोंद कुपवाड पोलिसांत झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे तपास करीत आहेत.