कुपवाड : पिंपरी-चिंचवड महापालिका इमारतीच्या धर्तीवर बांधण्यात आलेल्या प्रभाग क्रमांक तीनच्या नूतन कार्यालय इमारतीचे उद्घाटन नुकतेच झाल्यानंतर येत्या १५ डिसेंबरपासून पूर्ण क्षमतेने हे कार्यालय सुरू होणार आहे. या इमारतीमध्ये घरपट्टी, पाणीपट्टीसह सर्व विभाग सुरू करण्यात येणार असल्याने येथील नागरिकांना सांगली, मिरजेला मारावे लागणारे हेलपाटे आता बंद होणार आहेत. यातील बहुतांश विभागांच्या संगणकीकरणावर प्रशासनातर्फे भर दिला जाणार आहे.कुपवाड शहरातील नागरिकांना महापालिकेच्या कामासाठी यापूर्वी सांगली, मिरजेला हेलपाटे मारावे लागत होते. अतिशय लहान असलेल्या या इमारतीमध्ये पाच ते सहा टेबल लावून प्रभागाचे कामकाज सुरू होते. महापालिका असूनही नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. त्यातच सांगली, मिरजेला मात्र भव्य प्रशासकीय इमारती आहेत. मात्र कुपवाड शहर महापालिकेमध्ये समाविष्ट होऊनही सोळा वर्षे झाली तरीही प्रशस्त अशी इमारत नव्हती. त्यामुळे पूर्वीची ग्रामपंचायतच बरी, अशी भावना शहरवासीयांतून व्यक्त होत होती. महापालिका प्रशासनाने नागरिकांची धावपळ ओळखून या शहरासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका इमारतीच्या धर्तीवर नव्याने प्रभाग इमारत बांधण्यास सहा वर्षांपूर्वी प्रारंभ केला. या इमारतीच्या बांधकामासही सुरुवात झाली. यासाठी त्यावेळी ४५ लाखांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, थोड्या कालावधीनंतर या इमारतीकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. बरीच वर्षे रखडलेल्या या इमारतीसाठी निधीचीही टंचाई जाणवू लागली होती. त्यातच नगरसेवक प्रशांत पाटील यांची महापालिकेच्या उपमहापौरपदी निवड झाल्यानंतर शहरातील नागरी सत्कारप्रसंगी त्यांनी या नव्या इमारतीच्या पूर्णत्वाचे अभिवचन नागरिकांना दिले. पद स्वीकारल्यानंतर महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असूनही उपमहापौर पाटील यांनी प्रयत्न करून गटनेते किशोर जामदार, महापौर विवेक कांबळे, नूतन सभापती संतोष पाटील यांच्या सहकार्याने ही इमारत पूर्ण करून दाखविली. आयुक्त अजिज कारचे यांनी विशेष सहकार्य केल्यामुळेही प्रभाग इमारत पूर्णत्वास मदत मिळाली. या इमारतीसाठी दीड कोटीच्या जवळपास निधी खर्च झाला आहे. भव्य अशा इमारतीबरोबरच कंपाऊंड वॉल, स्ट्रिटलाईट, प्रशस्त लॉन तयार केले आहे. या इमारतीमध्ये घरपट्टी, पाणीपट्टी, आरोग्य, स्ट्रिटलाईट, गुंठेवारी, बांधकामसह सर्व विभाग पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहेत. यातील बहुतांश विभागाचे संगणकीकरण करण्यात येणार आहे. येत्या १५ डिसेंबरपासून पूर्ण क्षमतेने हे कार्यालय सुरू होणार आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना सांगली, मिरजेला मारावे लागणारे हेलपाटे आता बंद होणार आहेत. कुपवाडवासीयांमध्ये या भव्य इमारतीमुळे चांगली भावना निर्माण होण्यास मदत होणार आहे. (वार्ताहर)सुविधा : कुपवाडच्या वैभवात भरमहापालिकेच्या स्थापनेनंतर सर्व पदाधिकारी आणि प्रशासनाच्या सहकार्याने शहरासाठी ही पहिलीच प्रशस्त अशी प्रशासकीय इमारत पूर्णत्वास आली आहे. या परिसरात स्ट्रिट लाईट, भव्य लॉनसह आकर्षक अशी इमारत उभी केल्याने शहराच्या वैभवात भरच पडणार आहे. हा एक पिकनिक पॉर्इंट होणार आहे. नागरिकांनीही चांगल्या सुविधांसाठी काही महत्त्वाच्या सूचना केल्यास त्यांचे स्वागत करून सुधारणा केल्या जातील, अशी प्रतिक्रिया उपमहापौर प्रशांत पाटील यांनी व्यक्त केली.
नव्या कार्यालयामुळे कुपवाडकरांचे हेलपाटे बंद
By admin | Published: December 07, 2015 12:04 AM