कुपवाड : शहरातील मिरज रस्त्यालगत असलेल्या पाण्याच्या टाकीजवळच्या नागरी वस्तीतील गावठी दारूअड्ड्यावर कुपवाड एमआयडीसी पोलिसांच्या दोन पथकांनी एकाच वेळी छापा टाकला. पाच संशयितांना अटक केली असून, त्यांच्याजवळील १ लाख ९ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मुख्य संशयित अप्पा धर्मा रजपूत (वय ५४),
प्रमोद अप्पा रजपूत (२७, दोघेही रा. हनुमाननगर, कुपवाड), शाबू भीमराव कोळी (२५), तुकाराम भीमराव कोळी (२६, दोघेही रा. शिवाजीनगर, बामणोली), सुनील धोंडिराम भोसले (४१, रा. उल्हासनगर, कुपवाड), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
सहायक पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांना याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार शुक्रवारी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे, तुषार काळेल, युवराज पाटील, राजू बोंद्रे, दिलीप भगत, सीमा मदने, सतीश माने, विजय घस्ते, नवनाथ खटके, प्रदीप भोसले यांच्या दोन पथकांनी एकाच वेळी दारूअड्ड्यावर छापा टाकला. या छाप्यात मुख्य संशयित अप्पा रजपूत गावठी दारूचे गाळप करताना मिळून आला. त्याचा मुलगा प्रमोद देशी, विदेशी दारूची जादा दराने विक्री करीत होता. दोघांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. पोलिसांनी त्यांच्याजवळील १ लाख ९ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.