सांगली : कुपवाड येथील अहिल्यानगरमधील संजय बाळकृष्ण भाट (वय ३५) या भेळ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या तरुणाचा खून केल्याप्रकरणी मुख्य संशयित अशोक वसंत पाटील याच्यासह तिघा संशयितांना बुधवारी सायंकाळी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. या तरुणाचा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे पोलीस तपासांतून स्पष्ट झाले आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये अशोक वसंत पाटील (३५), प्रकाश ऊर्फ अण्णा बाबा गवळी (२६) आणि अमित प्रकाश कांबळे (२७, सर्व रा. अहिल्यानगर, कुपवाड) यांचा समावेश आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मृत संजय भाट याचा भेळचा व्यवसाय होता. सांगली परिसरात तो भेळचा व्यवसाय करीत होता. तो विवाहित होता. दरम्यान, त्याच्याशेजारीच राहणारा मुख्य संशयित अशोक पाटील याच्या पत्नीशी संजय भाट याचे गेल्या बारा वर्षांपासून अनैतिक संबंध होते. याची माहिती मिळाल्यावर अशोक व संजय यांच्यामध्ये वाद झाला होता. नातेवाईक व स्थानिकांच्या मध्यस्थीने त्यांच्यातील वाद मिटविला होता. त्यानंतर दोन ते तीन वर्षे थांबून पुन्हा संजयने अशोकच्या पत्नीशी अनैतिक संबंध सुरू ठेवले होते. ही बाब अशोकच्या लक्षात आल्यानंतर त्याने पुन्हा संजयला ताकीद दिली होती. त्यातच मागील आठवड्यात एका सामाजिक कार्यकर्त्याच्या डिजिटल फलकावर संजयचे छायाचित्र छापून हे डिजिटल अशोकच्या भागात लावले होते. त्यावरूनही या दोघांमध्ये वाद झाला होता. त्यामुळे पत्नीशी असलेले अनैतिक संबंध व पोस्टरवरून झालेल्या तत्कालीन वादाचा राग मनात धरून मंगळवारी अशोकसह प्रकाश गवळी व अमित कांबळे यांनी तलवार, गुप्ती आणि कोयत्याने संजयच्या पोटात, डोक्यात आणि मानेवर तीस वार करून त्याचा निर्घृण खून केला. त्यानंतर त्यांनी अंधाराचा फायदा घेत पलायन केले. याप्रकरणी मृत भाट याचा मेहुणा संजय अण्णासाहेब पाटील (रा. अहिल्यानगर) याने एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी अठरा तासांतच तिघा संशयितांना बुधवारी सायंकाळी तासगाव फाट्यावर अटक केली. संशयितांना पकडण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात करण्यात आली होती. (वार्ताहर)
कुपवाडचा खून अनैतिक संबंधातून
By admin | Published: November 19, 2015 12:49 AM