वाळवा तालुक्यामध्ये कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. वाळवा आणि शिराळा तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या कुरळप प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मदतीने कुरळपमध्ये शंभर बेडचे कोविड रुग्णालय चालू करण्यासाठी वारणा शिक्षण संस्थेकडे सुसज्ज इमारत आहे. या इमारतीमध्ये बेड सुद्धा उपलब्ध आहेत. तसेच स्वच्छतागृहांची स्वतंत्र व्यवस्था आहे. पार्किंगची सोय आहे. त्यामुळे या ठिकाणी कोविड रुग्णालय निर्माण करताना शासनाने वैद्यकीय सुविधेबरोबरच डॉक्टर्स, औषधे, परिचारिका आदी सुविधा दिल्या, तर शंभर रुग्णांसाठी याठिकाणी कोविड रुग्णालय सुरू करणे शक्य होईल. संस्थेने सामाजिक बांधिलकी म्हणून सुवर्णमहोत्सवी वर्षात हे समाजउपयोगी पाऊल उचलले आहे.
याबाबतचा प्रस्ताव पालकमंत्री जयंत पाटील व जिल्हाधिकारी यांना दिला आहे. तो मान्य झाल्यास कुरळप येथे संस्थेच्या इमारतीमध्ये रुग्णालय सुरू करता येईल असे मत संस्थेचे सचिव व पश्चिम महाराष्ट्र सहकारी संघाचे अध्यक्ष डॉ. प्रताप पाटील यांनी व्यक्त केले.