इस्लामपूर : गाव तिथे शाळा आणि शाळेत प्रशिक्षित शिक्षक असला पाहिजे. तो बहुजन असला पाहिजे आणि तो गावाचा सेवक असला पाहिजे. असा कर्मवीरांचा आग्रह होता. या आग्रहातूनच त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून श्रम आणि शिक्षण यांची सांगड घातली. त्यामुळेच श्रमाला महत्त्व देणारी पिढी राष्ट्र उभारणीच्या कार्यात कामी आली, असे प्रतिपादन धनाजी गुरव यांनी केले.
येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज आणि सम्यक विद्रोही प्रबोधन संस्था यांच्यातर्फे कर्मवीर जयंती सप्ताहानिमित्त दुसऱ्या दिवशीच्या व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. प्राचार्य डॉ. अरुण पाटील अध्यक्षस्थानी होते.
गुरव म्हणाले, शैक्षणिक चळवळीसह स्वातंत्र्याच्या चळवळीबरोबरच तत्कालीन सर्व प्रकारच्या चळवळींशी कर्मवीरांचा खूप जवळचा संबंध होता. स्वातंत्र्य चळवळीतील अनेक भूमिगत स्वातंत्र्यसेनानींना त्यांनी आश्रय दिला होता. त्या काळातले अनेक महापुरुष प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष एकमेकांच्या कामाशी जोडलेले होते. निवडणुकीच्या राजकारणापासूनही ते अलिप्त नव्हते. त्यातूनच पुढे शेतकरी कामगार पक्ष या शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नावर लढणाऱ्या राजकीय पक्षाचा जन्म झाला.
क्रांतिवीरांगणा हौसाताई पाटील यांना कार्यक्रमात श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रा. एस. के. माने यांनी प्रास्ताविक केले. डॉ. राजेश दांडगे यांनी वक्त्यांचा परिचय करुन दिला. प्रा. विश्रांत रास्कर यांनी आभार मानले. प्रा. अलका पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
फोटो : २६ इस्लामपुर १
ओळ : इस्लामपूर येथे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात धनाजी गुरव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी एस. के. माने, डॉ. अरुण पाटील, डॉ. नितीन शिंदे, डॉ. प्रमोद गंगनमाले उपस्थित होते.