इस्लामपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात झालेल्या कर्मवीर जयंती कार्यक्रमात डॉ. नंदकुमार मोरे यांनी मार्गदर्शन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : कर्मवीर भाऊराव पाटील हे राजर्षी शाहू महाराजांच्या विचारदृष्टीचा परिपाक होते. त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून जातीय चौकटी मोडण्याचे क्रांतिकारी कार्य केले. श्रम हा त्यांच्या शिक्षणविषयक तत्वज्ञानाचा पायाभूत गाभा होता, तो त्यांनी प्राणपणाने रुजवला, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभागातील समीक्षक डॉ. नंदकुमार मोरे यांनी केले.
येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात १३४ व्या कर्मवीर जयंतीचा कार्यक्रम उत्साहात झाला. प्राचार्य डॉ. अरुण पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. डाॅ. नंदकुमार मोरे यांच्या हस्ते कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ‘कर्मवीरांची शिक्षण दृष्टी आणि आजचे शिक्षण’ या विषयावर डॉ. मोरे यांनी मनोगत व्यक्त केले.
डॉ. मोरे म्हणाले, श्रमाच्या तत्वज्ञानातून विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन, स्वाभिमान आणि आत्मविश्वास वाढीस लागला. त्यामुळे त्याकाळी श्रमाला महत्त्व देणारा समाज आकाराला आला. नव्वदीनंतरच्या झपाट्याने बदलणाऱ्या काळाने शिकणाऱ्या पिढीसमोर अनेक प्रकारची आव्हाने निर्माण केली आहेत. आनंददायी शिक्षण ही संकल्पना आज कालबाह्य झाली आहे. या काळाने विद्यार्थ्यांची सर्जनशीलता मारून टाकली आहे. शारीरिक श्रमाचे काम करणाऱ्या माणसाला या व्यवस्थेने बेदखल केले आहे. पॅकेज संस्कृतीने बसून खातो तो श्रेष्ठ आणि कष्ट करतो तो दुय्यम अशी विभागणी केली आहे. माणसा-माणसांमध्ये भेद करणारी ही विभागणी मोडून काढायची असेल, तर आपल्याला पुन्हा नव्याने कर्मवीरांचे विचार समजून घ्यावे लागतील.
प्रा. प्रमोद गंगनमाले यांनी स्वागत केले. प्रा. एस. एस. चोपडे यांनी परिचय करून दिला. प्रा. व्ही. बी. सुतार यांनी आभार मानले. यावेळी उपप्राचार्य डॉ. नितीन शिंदे, प्रा. डी. जी. चव्हाण, धनाजी गुरव यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.