विटा : महागाई निर्देशांकातील वाढीचा विचार करून विटा येथील यंत्रमाग कामगारांना ५२ पीकच्या कापडाला प्रति मीटर ७ पैसे मजुरीत वाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय विट्यातील यंत्रमागधारकांनी बैठकीत घेतला. या मजुरी वाढीमुळे कामगारांना आता प्रति मीटर ९५ पैसेऐवजी १ रूपया २ पैसे मजुरी मिळणार असून त्याची अंमलबजावणी १ जानेवारी २०१६ पासून करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. यंत्रमागधारकांच्या या निर्णयामुळे कामगारांत फिलगुडचे वातावरण निर्माण झाले आहे.इचलकरंजीच्या यंत्रमाग धारकांनी महागाई निर्देशांकातील वाढीचा विचार करून ५२ पीकच्या कापडाला प्रति मीटर ७ पैसे मजुरीत वाढ देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे अनुकरण विट्यातील यंत्रमागधारकांनीही केले आहे. यंत्रमाग कामगारांना मजुरीत वाढ देण्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील यंत्रमागधारकांची बैठक विटा यंत्रमाग संघाच्या सभागृहात अध्यक्ष किरण तारळेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी कामगारांना इचलकरंजीप्रमाणे ५२ पीकच्या कापडाला मजुरीत प्रति मीटर ७ पैसेप्रमाणे मजुरीवाढ देण्याचा निर्णय झाला.या मजुरी वाढीमुळे यापुढील काळात कामगारांना प्रति महिना ६०० ते ७०० रूपये, तर वार्षिक ७ ते ९ हजार रूपयांची वेतनवाढ होणार आहे. यंत्रमाग कामगारांप्रमाणेच कारखान्यात काम करणारे जॉबर, कांडीवाले, घडीवाले, वहीफणी कामगार व दिवाणजी यांनाही सर्वसाधारणपणे ७ टक्के मजुरीवाढ देण्याचाही निर्णय घेण्यात आला. बैठकीस विटा यंत्रमागचे अध्यक्ष किरण तारळेकर, दत्तोपंत चोथे, वैभव म्हेत्रे, मधुकर म्हेत्रे, वासुदेव चोथे, शिवाजीराव कलढोणे, दीपक कदम, दिलीप देशमुख, अनिल चोथे, विनोद तावरे, मदन तारळेकर, डी. के. चोथे, धनंजय चोथे, महालिंग लोटके, राजू चौगुले, शशिकांत तारळेकर, रामचंद्र तारळेकर, मिलिंद चोथे, प्रकाश मराठे, राजेंद्र तारळेकर, शीतल म्हेत्रे, सुनील लिपारे, कन्हैया शेंडे, नितीन तारळेकर यांच्यासह यंत्रमागधारक उपस्थित होते. (वार्ताहर)...विटा येथील यंत्रमाग कामगारांना प्रति मीटर ७ पैसे मजुरीवाढ देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे कामगारांना दरमहा ६०० ते ७०० रूपयांची वेतनवाढ मिळणार आहे. या मजुरी वाढीमुळे शहरातील यंत्रमागधारकांवर प्रति महिना १५ ते २० लाख, तर वार्षिक सुमारे दोन ते अडीच कोटी रूपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. हा अतिरिक्त बोजा सद्यस्थितीत यंत्रमाग लघुउद्योगाला पेलणारा नसला तरी, बाजारातील महागाई व इचलकरंजी कराराचा सन्मान राखून ही वेतनवाढ मान्य करण्याचा निर्णय विट्यातील सर्व यंत्रमागधारकांनी एकत्रितपणे घेतला आहे.- किरण तारळेकर, अध्यक्ष, विटा यंत्रमाग संघ
विट्यात यंत्रमाग कामगारांच्या मजुरीत वाढ
By admin | Published: January 18, 2016 11:22 PM