सांगली येथे शनिवारी ते पत्रकारांशी बोलत होते. देशमुख म्हणाले, मजूर फेडरेशनच्या माध्यमातून आजवर अनेक कामे झाली. ही सहकार चळवळ आहे. जिल्हा मजूर फेडरेशनच्या नेतृत्वाखाली १५ लाखांपर्यंत कामाची मर्यादा होती. ती वाढवून ३० लाख करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतला. या फेडरेशनचे सहकार चळवळीतील अनेक मातब्बर नेत्यांनी नेतृत्व केले आहे. आजही सर्वपक्षीय नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली हे फेडरेशन काम करीत असल्याने राज्यात या फेडरेशनची वेगळी प्रतिमा आहे. मात्र प्रशासनातील अधिकारी गेल्या काही दिवसांत मजूर फेडरेशनला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून नाहक बदनामी करीत आहेत. काही अधिकारी त्यांना गरज असेल त्यावेळी मजूर सोसायटीचा उपयोग करतात आणि त्यांच्यावर वेळ आली की कायद्याचा बडगा उगारतात. सहकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये वास्तविक कायदा आणि व्यवहार यांची सांगड घालून काम करावे लागेल. जिल्हा मजूर फेडरेशनमध्ये जिल्ह्यातील सर्वपक्षीय संचालक मंडळ काम करीत आहे. या फेडरेशनला सहकार चळवळीचा एक इतिहास आहे. ‘सहकारातून उद्धार’ हे ब्रीद घेऊन काम करीत आहेत. आजपर्यंत फेडरेशनची कोणीही अशा प्रकारे बदनामी केली नाही. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी आपला दृष्टिकोन बदलावा अन्यथा आम्हालाही याविरोधात हालचाली कराव्या लागतील.
जिल्हा परिषदेतील प्रत्येक कामात काही अधिकारी मजूर सोसायट्यांना तुसडी वागणूक देत आहेत. एखादे काम चुकले असेल तर त्यांनी निश्चित ते दाखवून संबंधितांवर कारवाई करावी; पण सरसकट सर्व सोसायट्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्यास आम्ही शांत बसणार नाही, असेही ते म्हणाले.