लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी शहरातील शिवाजी मंडई येथील भाजी विक्रेत्यांकडून भाजीपाल्याचे नमुने तपासणीसाठी घेतले. जवळपास ३० भाजीपाल्यांचे नमुने घेण्यात आले असून, त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे सहायक आयुक्त सु. आ. चौगुले यांनी सांगितले.
शहरातील नागरिकांना आरोग्यदायी भाजीपाला मिळावा, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानुसार शुक्रवारी शहरातील शिवाजी मंडईत अन्न व औषध प्रशासन व पोलीस विभागाच्यावतीने भाजीपाला विक्रेत्यांची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत विक्रेत्यांना नोंदणी प्रमाणपत्र घेण्याबाबत सूचना करण्यात आल्या. भाजीपाला विक्रेत्यांची तपासणी करून ३० भाज्यांचे नमुनेही तपासणीसाठी घेतले. हे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे चौगुले म्हणाले.
यावेळी अन्न सुरक्षा अधिकारी कोळी, महाजन, नमुना सहायक कवळे उपस्थित होते.
फोटो ओळी :- शहरातील शिवाजी मंडई येथे अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने भाजी विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली.