मिरज : मिरजेत कृष्णा घाटावर नदीत बुडाल्याने रामस्वरूप यादव (वय २३), जितेंद्र यादव (वय २१, रा. जयपूर) या दोन परप्रांतीय मजुरांचा मृत्यू झाला. बुडणाऱ्या एकास वाचविण्यात आले. महापालिका अग्निशामक दल व आयुष सेवाभावी संस्थेच्या स्वयंसेवकांनी सहा तास नदीपात्रात शोधमोहीम राबवून दोघांचे मृतदेह बाहेर काढले.फरशी फिटिंगकाम करणारे राजस्थानी मजूर मिरजेतील सुभाषनगर रोड दत्तनगर येथे गेले वर्षभर वास्तव्यास आहेत. गुरुवारी कामाला सुटी असल्याने सकाळी कृष्णाघाटावर नदीत कपडे धुण्यासाठी पाच जण गेले होते. नदीपात्रात कपडे धुवून रामस्वरूप यादव, जितेंद्र यादव व रामकुमार मुरलीधर यादव हे तिघे जण पोहण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही खोल पाण्यात बुडू लागले.
त्यांच्या आरडाओरडामुळे स्थानिक नागरिकांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. यावेळी तेथे असलेल्या ओम सूरज पाटील या तरुणाने पाण्यात उडी मारून सुनील यादव या एकास बाहेर काढले. मात्र, रामस्वरूप व जितेंद्र यादव हे दोघेजण खोल पाण्यात बुडाले.बुडालेल्या दोघांचा शोध घेण्यासाठी मिरज अग्निशमन दल व आयुष्य सेवाभावी संस्थेच्या स्वयंसेवकांना पाचारण करण्यात आले. बुडालेल्या दोघांना शोधण्यासाठी सकाळी दहा वाजल्यापासून अग्निशामक दलाच्या बोटीतून नदीपात्रात शोध कार्य सुरू झाले. दुपारी एक वाजता रामस्वरूप यादव याचा मृतदेह सापडला. दुपारी चार वाजता जितेंद्र यादव याचाही मृतदेह शोधण्यात आला. मृत रामस्वरूप यादव हा वाचलेल्या रामकुमार मुरलीधर यादव याचा सख्खा भाऊ आहे. पोहता येत नसतानाही पाण्यात उतरणे तिघांच्याही अंगलट आले. रामकुमार मुरलीधर यादव याचे नशीब बलवत्तर असल्याने तो बचावला. मात्र, त्याच्या भावासह दोघांचा जीव गमवावा लागला. नदीपात्रात शोधकार्य सुरू असताना घाटावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. याबाबत गांधी पोलिस चौक पोलिसात नोंद असून सहायक निरीक्षक नितीन कुंभार, हवालदार चंद्रकांत जाधव पुढील तपास करीत आहेत.