संख : प्रशासनाच्या समन्वयचा अभाव, लोकांचे अज्ञान, बेफिकिरीमुळे जत तालुक्यात कोरोनाने चांगलाच शिरकाव केला आहे. ग्रामीण भागातील २१ गावे कोरोना हॉटस्पॉट आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दररोज ३०० च्या जवळपास आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीत तालुका पहिल्या क्रमांकवर आहे. यामुळे आरोग्य विभाग, प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
कोरोना हॉटस्पॉट गावांची संख्या वाढली आहे.
संशयित रुगणांची प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात अँटीरॅपिड चाचणी केली जाते. पॉझिटिव्ह रुग्णांचे नातेवाईक, संपर्कातील व्यक्तीचे आरटीपीसीआर घेतले जाते. याचा अहवाल येण्यास चार दिवस लागतात. तोपर्यंत संशयित रुग्ण गावभर फिरतो. पोलीस प्रशासनाचे कडक निर्बंध नाहीत.
तालुक्यात जत, शेगाव, माडग्याळ, वळसंग, उमराणी, डोर्ली, बनाळी, पाच्छापूर, कुणीकोणूर, बिळूर, उमदी ही गावे कोरोना हॉटस्पॉट बनली आहेत. तर सनमडी, संख, जालीहाळ बुद्रुक या गावात रुग्णसंख्या वाढत आहे.
तालुक्यात दोन ग्रामीण रुगणालय, आठ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ४२ उपकेंद्र आहेत. ग्रामीण रुग्णालयात २४ पदे रिक्त, तर प्राथमिक आरोग्य केंद्रात १२४ पदे रिक्त आहेत.
प्रशासन व आरोग्य विभाग कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहे.
कोट
सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे, ज्यांना ताप, सर्दी, खोकला आहे त्यांनी सरकारी रुग्णालयात तपासणी करून अँटिजन टेस्ट करावी.
- संजय बंडगर,
तालुका वैद्यकीय अधिकारी, जत
कोट
ग्रामदक्षता समितीने अलर्ट राहावे. ४५ वर्षांवरील नागरिकांनी दोन्ही डोसचे लसीकरण करून घ्यावे. नागरिकांना मास्क वापरावा. सोशल डिस्टन्सिंग पाळावे.
- आमदार विक्रम सावंत.
पाच दिवसांतील रुग्णवाढ
जत तालुक्यात ०९ मे रोजी १९५ रुग्ण, १० मे रोजी २९७, ११ मे रोजी २२०, १२ मे रोजी २९०, तर १३ मे रोजी २३८ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यात आजवर ६,६६६ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. १४१ जणांचा मृत्यू झाला, तर ४,५०० जणांनी कोरोनावर मात केली आहे. २,०२५ जणांवर उपाचार सुरू आहेत.