लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : शहर आणि परिसरात कोरोना रुग्णा वाढत असून, पालिका प्रशासनाला गांभीर्य नाही. भाजीपाला विक्रेते मुख्य रस्त्यावरच बाजार मांडत आहेत. त्यामुळे रोज सकाळी सात ते अकरापर्यंत गर्दी असते. पालिका प्रशासन केवळ वाहनातून पुकारण्यापलीकडे कारवाई करीत नाही. त्यामुळे विक्रेतेही शिरजोर झाले आहेत.
तहसील कार्यालय ते केबीपी महाविद्यालयादरम्यान मुख्य रस्त्यावर चार ग्राहक बाजार आहेत. ते सकाळी सात ते अकरादरम्यान सुरू असतात. या परिसरातील बाजार समिती आवारात किरकोळ धान्य विक्रेते आणि किराणा दुकाने आहेत. मुख्य बाजारही येथे भरतो. सध्या आठवडा बाजार बंद आहे. लॉकडाऊन असल्याने फळे, भाजीपला विक्रेत्यांना प्रत्येक विभागात फिरून विक्री करण्याचे आदेश दिले आहेत. तरीसुद्धा ते मुख्य रस्त्यावर भाजीपाला मांडून गर्दी करत आहेत. पालिका प्रशासनाचे नियंत्रण नसल्यामुळे तेथे रोजच गर्दी होऊ लागली आहे.
इस्लामपूर आणि परिसरात रोज सुमारे दीडशेवर कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यांच्यावर उपचारासाठी बेड नाहीत. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेडची कमतरता आहे. गृह विलगीकरणातील रुग्ण औषध, फळे, भाजीपाला खरेदीसाठी खुलेआम रस्त्यावर फिरतात. फळे, भाजीपाला विक्रेते पालिका प्रशासनाला जुमानत नाहीत. जुन्या बहे नाक्यापासून ते केबीपी महाविद्यालयापर्यंत मुख्य रस्त्यावर भाजीपाला खरेदीसाठी गर्दी असते. ही कोरोनाची साखळी तुटणार कशी, असा सवाल उपस्थित होत आहे.
चौकट
फळ विक्रेत्यांची मनमानी
शहरातील फळ विक्रेत्यांचे हातगाडे मुख्य रस्त्यावर असतात. ते वाहतूक कोंडीला जबाबदार आहेत. नगरसेवक पाठीशी असल्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांला विक्रेते जुमानत नाहीत. रहदारीच्या रस्त्यावर हातगाडे लावून ते गर्दी करीत आहेत.