सांगली : जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पगारवाढ, बोनस आणि पदोन्नतीच्या माध्यमातून यंदा संचालक मंडळाने मोठी दिवाळी भेट दिली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी यंदाची दिवाळी गेल्या वीस वर्षांतील सर्वात मोठी दिवाळी ठरणार आहे. लक्ष्मीच्या पावलांनी आलेल्या या दिवाळीच्या स्वागताची जय्यत तयारी कर्मचाऱ्यांनी केली आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅँकेला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यात मोठे योगदान देणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना पगारवाढीच्या करारासाठी एक तप प्रतीक्षा करावी लागली. पदोन्नतीच्या प्रतीक्षेत वीस वर्षे घालवावी लागली. आर्थिक प्रश्न प्रलंबित असतानाही, जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांनी कधीही नकारात्मक भूमिका स्वीकारली नाही. आंदोलनाची भाषाही कधी केली नाही. बँकेप्रती असलेल्या त्यांच्या निष्ठेचे फळ त्यांना यंदाच्या दिवाळीत मिळत आहे. पगारवाढीचा निर्णय होऊन त्यासंदर्भातील करारही झाला. फरकासहीत ही रक्कम कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. दिवाळीचा बोनसही कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा झाला असून, दिवाळीपूर्वी आता पदोन्नतीची भेटही मिळणार आहे. एक, दोन नव्हे, तर तब्बल तीन मोठ्या गोष्टींचे लाभ कर्मचाऱ्यांच्या पदरात यंदा पडत आहेत. अध्यक्ष दिलीपतात्या पाटील, उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्यासह संचालक मंडळाने कर्मचाऱ्यांप्रती दाखविलेले औदार्य बॅँकेतील उत्साहाच्या वातावरणाला कारणीभूत ठरले आहे. बॅँकेच्या इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणावर लाभ पदरात पडण्याची ही एकमेव घटना आहे. गेल्या वर्षभरात अनेक विक्रम बँकेत नोंदले गेले आहेत. यामध्ये नफ्याचाही उच्चांकी विक्रम यंदा प्रस्थापित झाला. या गोष्टीलाही कर्मचारी आणि जिल्हा बॅँक अध्यक्षांचे कौशल्य कारणीभूत आहे. बॅँकेची आर्थिक स्थिती मजबूत करताना कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या आर्थिक अडचणींचा कधीही विचार केला नव्हता. मागणी करतानाही त्यांनी प्रशासक किंवा संचालक मंडळाप्रती नकारात्मक भावना ठेवली नाही. या सर्व गोष्टींमुळे त्यांच्या आर्थिक सक्षमतेचे सर्व प्रश्न यंदा सुटले आहेत. कमी मनुष्यबळ असताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण गेल्या काही वर्षांपासून होता. हा ताणही याचवर्षी दूर होणार आहे. बँकेच्या नोकरभरतीच्या प्रस्तावालाही सहकार विभागाने नुकतीच मान्यता दिली आहे. त्यामुळे जवळपास तीनशे नव्या कर्मचाऱ्यांची भरती बँकेत होणार आहे. याचा लाभ जुन्या कर्मचाऱ्यांना होणार आहे. त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण कमी होऊन त्यांना अधिक कुशलतेने काम करणे सोपे होणार आहे. या सर्व गोष्टींमुळे सध्या बॅँकेत उत्साहाचे वारे वाहू लागले आहे. (प्रतिनिधी) उद्दिष्टपूर्र्ती होणार : कर्मचाऱ्यांचेही सहकार्य जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी यंदा शंभर कोटी नफ्याचे उद्दिष्ट कर्मचाऱ्यांना दिले आहे. कर्मचाऱ्यांना हव्या असलेल्या सर्व गोष्टी दिल्यामुळे, त्यांनी ही उद्दिष्टपूर्ती करावी, अशी अपेक्षाही त्यांनी यापूर्वी व्यक्त केली आहे. कर्मचाऱ्यांनीही दिवाळीची जय्यत तयारी करतानाच, बँकेच्या नफावृद्धीसाठीही कंबर कसली आहे.
लक्ष्मीच्या पावलांनी आली कर्मचाऱ्यांच्या घरी दिवाळी
By admin | Published: October 17, 2016 12:43 AM