मिरज : मिरजेत शनिवार पेठेत चोरट्यांनी बुधवारी भरदिवसा सराफी दुकानातील दागिने, रोख रक्कम असा तीन लाखांचा ऐवज लंपास केला. सराफाच्या डोळ्यादेखत त्यास संमोहित करून दागिने, रोख रक्कम लुटणाऱ्या चोरट्यांच्या कृत्याचे सीसीटीव्हीत चित्रण झाले आहे. चोरीच्या या नवीन प्रकारामुळे पोलिस यंत्रणा चक्रावली आहे.शनिवार पेठेत स्वामी ज्वेलर्स या सराफी दुकानात दुपारी दोन वाजता दोन तरुण आले. सराफ श्रीशैल स्वामी जेवणासाठी घरी गेले असल्याने वडील शंकर स्वामी (वय ७५) दुकानात बसले होते. गिऱ्हाईक बनून आलेल्या दोघांनी शंकर स्वामी यांना आपण लष्करात अधिकारी असून, बाळअंगठी खरेदी करावयाची असल्याचे सांगितले. चोरट्यांनी बोलता-बोलता वृध्द स्वामी यांना संमोहित करून दुकानाच्या शोकेसमधून बॉक्स काढावयास लावून त्यातील अंगठ्या, कर्णफुले, गळ्यातील पदकेअसे दोन ते पाच ग्रॅमचे दागिने दुकानातीलच एका पिशवीत भरले. एकाने ड्रॉवरमधील २५ हजार रोख रक्कम काढून घेतली. हा सर्व प्रकार शंकर स्वामी यांच्यासमोरच सुरू होता. चोरट्यांनी पवारसाहेब असे नाव सांगून बाळअंगठी खरेदीची ३०० रुपयांची पावती स्वामी यांना करावयास लावली. स्वामी पावती करीत असताना दोन्ही चोरटे तेथून गडबडीत निघून गेले. दोन्ही चोरटे गेल्यानंतर स्वामी यांना काहीतरी चुकल्याची जाणीव झाल्याने त्यांनी मुलगा श्रीशैल यास दूरध्वनी करून तातडीने दुकानात येण्यास सांगितले. श्रीशैल दुकानात आल्यानंतर चोरट्यांनी दुकानातील दहा तोळे दागिने लुटल्याचे निदर्शनास आले. चोरीप्रकरणी स्वामी यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली असून, पोलिसांनी चोरट्यांचे चित्रण झालेले सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. (वार्ताहर)दहा मिनिटात संमोहनस्वामी यांनी एक वर्षापूर्वी स्वामी ज्वेलर्स हे दुकान सुरू केले आहे. चोरट्यांनी नेमके काय केल्यामुळे त्यांना दागिने दिले, हे स्वामी यांना आठवत नव्हते. चोरटे सांगतील त्याप्रमाणे स्वामी यांनी शोकेसमधील दागिने काढून दुकानातीलच पिशवीत भरून दिल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. चोरट्यांनी संमोहित करून दुपारी १.५५ ते २.०५ या दहा मिनिटात चोरट्यांनी दुकानातील सोने लुटले. दुकानात आणखी सोने होते, मात्र स्वामी यांचा मुलगा दुकानात येण्यापूर्वी चोरट्यांनी दहा तोळे दागिने घेऊन पळ काढला. चोरट्यांनी पाळत ठेवून वृध्द सराफ स्वामी दुकानात असताना चोरी केल्याचा संशय आहे.
सराफास संमोहित करून दागिने लंपास
By admin | Published: February 15, 2017 11:28 PM