नितीन पाटील यांचे येथील एसबीआयच्या शाखेत खाते आहे. या खात्यावर वीस दिवसांपूर्वी द्राक्ष विक्रीचे तीन लाख ९२ हजार रुपये जमा करण्यात आले होते.
सोमवारी सकाळी साडेअकराच्या दरम्यान पाटील दुचाकीवरून बँकेत खात्यावरील पैसे काढण्यासाठी आले होते. दुपारी साडेबाराच्या दरम्यान तीन लाख ५० हजार रुपये त्यांनी काढले. हे पैसे त्यांनी सोबत आणलेल्या वायरच्या पिशवीमध्ये ठेवले व ते बँकेबाहेर ती पिशवी दुचाकीच्या डाव्या बाजूस मागील चाकावर असलेल्या हुकास अडकवली तेव्हा दुचाकीचे पुढील चाक पंक्चर असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी फोनवरून वडिलांना बँकेतून पैसे काढल्याचे सांगितले व गाडीचे पंक्चर काढण्यासाठी किरण बारच्या समोर येत असल्याचे सांगितले.
त्यांनी वडिलांना तेथे बोलावले. दुचाकीचे पंक्चर काढले तेव्हा पैशांची पिशवी तशीच होती. पिशवीतील ५० हजार रुपये कर्जाचा हप्ता भरण्यासाठी वडिलांना दिले. वडील तेथून निघून गेले होते.
दुपारी एकच्या दरम्यान पाटील पंक्चरच्या दुकानातून निघून बागवान चौकात पोहोचले असता तेथे मागे वळून पाहिले असता पैशांची पिशवी दुचाकीला नसल्याचे लक्षात आले.
त्यांनी थांबून आजूबाजूस व पंक्चरच्या दुकानासमोर येऊन पाहिले. मात्र पिशवी कोठेही आढळून आली नाही. चोरट्याने तीन लाख रुपयांची ती पिशवी चोरून नेल्याची खात्री झाली. त्यानंतर त्यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.