सांगली : मिरज येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सचिन सुगाणावर यांची काळूबाळूवाडी (ता. सांगोला) येथील साडेपाच एकर शेतजमीन बनावट शपथपत्राद्धारे इतरांच्या नावावर केल्याबद्दल त्यांच्या चुलत भावासह सांगोला येथील मंडल अधिकारी, तलाठ्यासह १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत डॉ. सचिन सुगाणावर यांनी संशयित राहुल कुमार सुगाणावर (रा. ब्राह्मणपुरी, मिरज) याच्यासह त्याची आई, दोन बहिणींसह १३ जणांविरुद्ध सांगोला पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या जमिनीवरील सुमारे ६० लाख रुपयांचे लोखंडी अँगल, पत्रे व इतर साहित्य चोरीला गेल्याचीही तक्रार आहे. याबाबत सांगोला पोलिसांनी फसवणूक व चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.डाॅ. सुगाणावर यांचा चुलत भाऊ राहुल सुगाणावर याने बनावट शपथपत्राच्या आधारे वारस नोंद करून ही शेतजमीन नावावर करून घेतली. त्यानंतर ती विक्रीस काढल्याने हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात काळूबाळूवाडी येथील तलाठी साईनाथ रामोड, मंडल अधिकारी गजानन व्हनकडे व मुख्य संशयित राहुल सुगाणावर, त्यांची आई शोभा कुमार सुगाणावर, बहीण अश्विनी पंकज देवमोरे, दुसरी बहीण नेहा सुशांत निटवे, त्यांचे नातेवाईक शीतल महावीर सुगाणावर, अनिकेत अनिल सुगाणावर, संजय राजगोंडा सुगाणावर, महावीर पारिसा सुगाणावर, अनिल पारिसा सुगाणावर, अशोक पारिसा सुगाणावर व राजगोंडा पारिसा सुगाणावर यांचा समावेश आहे.काळूबाळूवाडी येथे रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत सुकुमार पारिसा सुगाणावर यांच्या नावे कोट्यवधी रुपये किमतीची शेतजमीन आहे. सुकुमार त्यांच्या मृत्यू पश्चात पुतण्या राहुल सुगाणावर याने ही शेतजमीन आपले वडील कुमार पारिसा सुगाणावर यांची असल्याचे खोटे शपथपत्र सादर करून स्वत:ची, आईची व दोन बहिणींच्या नावांची नोंद करून घेतली. यासाठी त्यांना काळूबाळूवाडी येथील तलाठी व मंडल अधिकाऱ्यांनी मदत केल्याची तक्रार आहे.
या जमिनीची नावावर नोंदणी झाल्यानंतर तेथील बेदाणा शेडचे लोखंडी अँगल, पत्रे, जाळीचे कुंपण अशा साठ लाख रुपयांच्या साहित्याची विक्री करून जमीनही विक्रीसाठी काढल्याचे डॉ. सुगाणावर यांनी तक्रारीत म्हटले आहे. याबाबत सांगोला पोलिस ठाण्यात १३ जणांविरुद्ध फसवणूक व दोन बनावट शपथपत्र केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.