लोकमत न्यूज नेटवर्क
कोकरूड : नव्याने करण्यात आलेल्या पाचवड (ता. कऱ्हाड) ते मलकापूर (ता. शाहूवाडी) या राज्य मार्गाच्या रस्ता रुंदीकरणाने कोकरूड परिसरातील जमिनीची भाव गगनाला भिडले आहेत. अनेकांनी खरेदीचे व्यवहार केले असून, या मार्गावर अनेक छोटे-मोठे व्यवसाय उभे राहू लागले आहेत.
कऱ्हाड तालुक्यातील पाचवड फाटा येथून उंडाळे, कोकरूड, मलकापूर, अनुसखोरा, पाचलमार्गे कोकणातील मुंबई, गोवा या राष्ट्रीय मार्गाला जोडला जाणार आहे. राजापूरला जोडणाऱ्या राज्य मार्ग १५८ च्या रुंदीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. पाचवड फाटा ते कोकरूडपर्यंतचा रस्ता पूर्ण तयार झाला आहे. मलकापूर ते पाचवडपर्यंतचे काम वेगाने सुरू आहे. कोकणात जाणारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोडणारा रस्ता असल्याने या मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढत्या रहदारीमुळे या मार्गालागत असणाऱ्या जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. इस्लामपूर, सांगली, कऱ्हाड, कोल्हापूरसह अनेक ठिकाणांच्या लोकांनी व्यवसायाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी केल्या आहेत. कोरोनाकाळात नोकरी गमावलेल्या अनेकांनी या रस्त्यालगत छोटे-मोठे व्यवसायही सुरू केले होते. मात्र लॉकडाऊनमुळे सध्या हे व्यवसाय बंद आहेत. याच मार्गावर नवीन व्यवसायाच्या निमित्ताने बांधकामे सुरू आहेत. रस्ता रुंदीकरणाने स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होणार असून, अनेक लहान-मोठे उद्योग, व्यवसाय उभे राहणार असल्याने नवीन रस्ता रुंदीकरणाने शेतकऱ्यांच्या जमिनीला चांगला दर येत आहे.