सांगली : महापालिकेच्या मालकीचा अभिनंदन कॉलनीतील कोट्यवधी रुपये किमतीचा खुला भूखंड विकण्याचा घाट घालण्यात आला असल्याचा प्रकार नगरसेवक सुनील कलकुटगी यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला आहे. याबाबत त्यांनी आयुक्त अजिज कारचे यांच्याकडे तक्रारही केली आहे. ते म्हणाले की, अभिनंदन कॉलनीत पालिकेच्या मालकीचा खुला भूखंड आहे. या भूखंडावर अद्याप पालिकेचे नाव लागलेले नाही. या भूखंडावर मुखत्यारपत्राच्या नावाखाली कोणी तरी सात-बारा व सिटी सर्व्हे उताऱ्यावर नोंद केली आहे. मूळ मालकाच्या संमतीने त्यांनी आपल्या नावाची नोंद केली आहे. आता ही जागा विक्रीचा घाट घातला असून, संबंधितांनी भूखंडाला कंपाऊंड घालून जागेचा ताबा घेतला आहे. या भूखंडावर प्लॉट पाडण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे महापालिकेला कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे. तरी महापालिकेने तातडीने या जागेची विक्री रोखण्यासाठी पावले उचलावीत. भूखंडावर पालिकेचे नाव लावण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
महापालिकेचा भूखंड विकण्याचा घाट
By admin | Published: January 15, 2015 10:49 PM