जालिंदर शिंदे ल्ल घाटनांद्रेगेल्या दोन-तीन वर्षात घाटमाथ्यावर पावसाने दडी मारल्यामुळे, त्यातच चालूवर्षी अगदी अत्यल्प पाऊस झाल्याने दुष्काळी कायम दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कवठेमहांकाळ पूर्व भागातील घाटमाथ्यावर पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. परिसरातील भूगर्भातील पाण्याची पातळी कमालीची घटल्यामुळे पाणीटंचाईचे संकट उभे आहे. पाण्याच्या शोधात कूपनलिकांची खुदाई करताना जागोजागी जमिनीची चाळण होत असल्याचे चित्र आहे. डिसेंबरअखेरच घाटमाथ्यावरील पाझर तलाव, ओढे, बंधारे, नाले कोरडे ठणठणीत पडले आहेत. पाण्याचे तीव्र संकट निर्माण झाले आहे. या पट्ट्यात कुची वगळता कोठेही जलसिंचन योजनेचे काम झाले नसल्याने पाण्यासाठी कोणतेही स्रोत उपलब्ध नाही. परिणामी बळीराजा बागायती क्षेत्र जगविण्यासाठी कूपनलिकांच्या खुदाईकडे वळत आहे. त्यामुळे जमिनीची चाळण होऊ लागली आहे.कवठेमहांकाळ तालुक्यात भूगर्भातील पाण्याचा शोध घेताना शेतकऱ्यांना लाखो रुपये मोजत आहेत. तालुक्यात काही भागातच जलसिंचन योजनेची कामे झाली असून बराच भाग सिंचन योजनेपासून वंचित आहे. त्यामुळे तालुक्यात पाण्याच्या शोधासाठी सरासरी दररोज चार ते पाच ठिकाणी कूपनलिका घेतल्या जात आहेत. गेल्या दोन-तीन वर्षापासून तालुक्यात सरासरीपेक्षा अगदी कमी पाऊस झाल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी तलाव, ओढे, नाले, बंधारे काही ठिकाणी मृत अवस्थेत तर काही ठिकाणी कोरडे ठणठणीत आहेत. त्यामुळे घाटमाथ्यावरील भूगर्भातील पाणीसाठा संपुष्टात येऊ लागला आहे. त्यामुळ शेतकरी राजा पिके जगविण्यासाठी पाण्याची समस्या सोडविण्यासाठी धडपड करु लागला आहे. त्यासाठी कूपनलिका खुदाईशिवाय इतर कोणताही पर्याय नाही. यासाठी मोठा खर्च करावा लागत आहे. भूगर्भातील पाण्याचा शोध घेताना ४०० ते ५५० फूटापर्यंत खुदाई करावी लगात आहे. त्यासाठी साधारणत: ३५ ते ४० हजार रुपये मोजावे लागत असून पाणी लागलेच तर ते पिकापर्यंत नेण्यासाठी पाईपलाईन, मोटर, केबल, पेटी यासाठी एक लाख रूपयापर्यंत खर्च करावा लागत आहे. एवढे खर्च करुन ही पाण्याचा उपभोग मिळेलच असे नाही. सध्या कवठेमहांकाळ तालुक्यात अनेक बोअरवेल गाड्या तळ ठोकून असून, बरेच आॅफिसेस थाटली आहेत. दररोज किमान पाच सहा बोअरवेल घेतले जात असून, त्यामुळे पर्यावरणासही धोका पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.प्रतीक्षा टेंभूच्या पाण्याची कवठेमहांक़ाळ पूर्व भागातील घाटमाथ्यावरील गावांंना नेहमीच पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. सततच्या दुष्काळामुळे परिसरातील विहिरींचे पाणी खालावले आहे. कूपनलिकांमधून पूर्वी १०० फुटावर मिळणारे पाणी आज ४०० ते ५०० फूट खोदूनही मिळत नाही. यामुळे स्थिती गंभीर आहे. घाटमाथ्यावरील ११ गावांसाठी टेंभू योजनेअंतर्गत घाटनांद्रे उपसा सिंचन योजना मंजूर होण्याची प्रतीक्षा असून, त्यानंतर कायस्वरुपी दुष्काळी पट्टा म्हणून भाळी लावलेला टिळा पुसला जाणार आहे. आजपर्यंत केवळ आश्वासनावर समाधान मानावे लागत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात नाही. केवळ राज्यकर्त्यांच्या आश्वासनांवर किती दिवस पाण्याची प्रतीक्षा करायची, असा प्रश्न आता येथील शेतकरी उपस्थित करीत आहेत.
पाण्याच्या शोधात जमिनीची चाळण
By admin | Published: March 14, 2017 11:49 PM