फोटो - ३१०३२०२१-आयएसएलएम- इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती.
अशोक पाटील
इस्लामपूर : इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रांतर्गत चार साखर कारखाने असून, या कारखान्यांच्या माध्यमातून ऊस उत्पादनवाढीवर भर दिला जात आहे. याचा परिणाम कडधान्याच्या पिकांवर झाला आहे. त्यामुळे बाजार समितीच्या अंतर्गत असलेल्या मार्केट यार्डातील आडत व्यापाऱ्यांपुढे मोठे संकट उभा राहिले आहे. परिणामी सेसचे उत्पन्न कमी झाल्याने समित्या शेवटच्या घटका मोजत आहेत.
महाराष्ट्रातील नाशिक, सांगली आदी भागात द्राक्षांचे उत्पादन मोठे आहे. या ठिकाणाहून द्राक्षेसह बेदाण्याची निर्यात होते. सेसच्या माध्यमातून या परिसरातील कृषी उत्पन्न बाजार समितीला उत्पन्नाचे स्त्रोत आहे. अशीच अवस्था विदर्भ, मराठवाडा परिसरात कापूस, धान, तूरडाळ, मटकी आदी कडधान्ये, नगदी पिके भरपूर प्रमाणात उत्पादित होतात, तर ऊस पट्ट्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मात्र सलाईनवर आहे.
तालुका पातळीवरील बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात व्यापाराच्या नावाखाली घेतलेल्या अल्प भाडेपट्टीवर भूखंडाचा वापर राहण्यासाठी केला जात असून, या ठिकाणी टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. या इमारती व्यापारापेक्षा नेत्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या नावे दिसत असून, त्या इमारतीमध्ये पोटभाडेकरूंचे प्रमाण जास्त आहे. यांना कररूपाने वर्षासाठी १ रुपयापासून ३ रुपयांपर्यंत स्क्वेअर फुटावर भाडे आकारले जाते. यामध्ये वाढ केल्यास बाजार समितीला कायमस्वरूपी उत्पन्न मिळेल; परंतु हे राजकीय बगलबच्चे भाडेवाढीला विरोध करीत आहेत. त्यामुळेच बाजार समितीच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होत चालली आहे.
कोट
बाजार समितींना ऊर्जितावस्था येण्यासाठी कृषी पणन मंडळास द्यावे लागणारे अंशदान बंद करावे, पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी १०० टक्के अर्थसाहाय्य द्यावे, सरकारी जमिनी नाममात्र भाड्याने द्याव्यात, नव्याने प्रक्रियाउद्योग उभे करावेत, ब, क, ड वर्गातील बाजार समितींना आस्थापना खर्चाची टक्केवारी वाढवावी. पणन परवानाधारकांकडून संपूर्ण सेस बाजार समितीला मिळावा आदी पूर्तता झाल्यास कृषी उत्पन्न बाजार समितींना चांगले दिवस येतील.
- अल्लाउद्दीन चौगुले, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, इस्लामपूर