मिरज : गेले चार महिने धावणाऱ्या व मिरजेतून लातूरला पाणी नेणाऱ्या जलदूत एक्स्प्रेसला सोमवारी अखेरचा निरोप देण्यात आला. आ. सुरेश खाडे यांच्याहस्ते व जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या उपस्थितीत ‘जलदूत’ला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. रेल्वेने तब्बल १११ दिवस २६ कोटी लिटर पाणीपुरवठा करण्याचा जगातील पहिलाच प्रसंग आहे. याची लिम्का बुकात नोंद करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी गायकवाड यांनी सांगितले. लातूर येथे तीव्र पाणी टंचाईमुळे मिरजेतून रेल्वेने लातूरला पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. चार महिने दररोज जलदूत एक्स्प्रेसने लातूरला पाणीपुरवठा करण्यात आला. सोमवारी तिला अखेरचा निरोप देण्यात आला. आ. खाडे यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला.मजुरांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या सहकार्यामुळे रेल्वेने पाणी पुरवठ्याचा प्रयोग यशस्वी झाला. यापुढेही सण, उत्सव साजरे करताना, आपत्तीला तोंड देताना अशीच एकजूट दाखवावी, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी गायकवाड यांनी व्यक्त केली. ही संकल्पना मांडणारे भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य मकरंद देशपांडे म्हणाले की, मिरजेतून लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करण्यासाठी राज्य शासन व रेल्वे प्रशासनाने समन्वयाची भूमिका घेतल्याने पाणीपुरवठा शक्य झाला. आ. सुरेश खाडे म्हणाले की, लातूरला पाणी देऊन मिरजकरांनी चांगले काम केले आहे. यामुळे मिरजेचा लौकिक वाढला आहे.यावेळी रेल्वे यांत्रिकी अभियंता प्रमोदकुमार, स्थानक अधीक्षक बुध्ददेव भगत, विनोद कुलकर्णी, गाडीचे चालक व्ही. एल. घटकरी, गार्ड बी. डी. सोनवणे, सहाय्यक चालक एन. व्ही. उरकुडकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता एस. के. सादलगे यांचा जिल्हाधिकाऱ्यांनी सत्कार केला. रेल्वे प्रवासी संघटनेचे सुकुमार पाटील, भाजपचे ओंकार शुक्ल, शीतल पाटोळे, संजय चौगुले, भैय्या कुलकर्णी, समेध ठाणेदार उपस्थित होते. रेल्वेचालक व्ही. एल. घटकरी यांनी, समारोपाच्या फेरीचे सारथ्य करण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. (वार्ताहर)लातूर परिसरातील पावसामुळे निर्णय...मिरजेत रेल्वेच्या जलशुध्दीकरण केंद्रापासून रेल्वे यार्डापर्यंत दोन किलोमीटर जलवाहिनी बसविण्यात आली. ११ एप्रिलपासून ५० टँकरच्या साहाय्याने दररोज २५ लाख लिटर पाणी लातूरला पाठविण्यात आले. मिरजेतून रेल्वेच्या पाणी योजनेतून दररोज ५० रेल्वे टँकर घेऊन जाणाऱ्या जलदूत एक्स्प्रेसने १११ फेऱ्यांत सुमारे २६ कोटी लिटर पाणी लातूरला पोहोचविले आहे. जून व जुलै महिन्यात पावसाळ्यातही लातूरला पाणीटंचाई असल्याने ‘जलदूत’ला ३१ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र गेल्या आठवड्यात लातूर परिसरात पाऊस झाल्याने जलदूत एक्स्प्रेस दि. ८ आॅगस्टपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
जलदूत एक्स्प्रेसला अखेरचा निरोप
By admin | Published: August 08, 2016 11:03 PM