मायणी : कारगिल येथे कर्तव्य बजावत असताना धोंडेवाडी, ता. खटाव येथील शहीद जवान भागवत मुरलीधर बागडे यांच्यावर मंगळवारी (दि. ११) शासकीय इतमामात धोंडेवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी देण्यात आलेल्या ‘अमर रहे अमर रहे भागवत बागडे अमर रहे’च्या घोषणांनी अवघा आसमंत गहिवरला. अंत्यसंस्कारासाठी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सैन्यदलातील जवानांबरोबरच पोलिस दल व ग्रामस्थ उपस्थित होते. धोंडेवाडी, ता. खटाव येथील शहीद जवान भागवत मुरलीधर बागडे (वय ३४) हे २००३ पासून देशाची सेवा करीत होते. गुरुवारी कारगिल (लेह) पासून शंभर किलोमीटर अंतरावर कर्तव्य बजावत असताना ते शहीद झाले. मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता त्यांचे पार्थिव मूळगावी धोंडेवाडी येथे आणण्यात आले. यावेळी कोल्हापूर येथील आठ जवान व दहिवडी उपविभागीय पोलिस कार्यालयातील पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.घराजवळ ठेवलेल्या पार्थिवाचे आई, पत्नी, भाऊ, बहीण व मुलांसह ग्रामस्थ, मित्रांनी दर्शन घेतले. या ठिकाणी सैन्यदलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. तद्नंतर फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीतून शहीद जवान भागवत बागडे यांचे पार्थिव ‘अमर रहे अमर रहे भागवत बागडे अमर रहे,’ ‘भारत माता की जय,’ ‘जबतक सूरज चाँद रहेगा, तबतक भागवत नाम रहेगा,’ अशा घोषणा व फुलांची उधळण करीत नियोजित जागेपर्यंत नेण्यात आले. त्यावेळी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती. संपूर्ण गाव बंद ठेवण्यात आले होते. पार्थिव निश्चित स्थळी आणल्यानंतर खटाव-माण तालुक्यांसह सातारा, सांगली जिल्ह्यांतील राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रांतील मान्यवरांसह पोलिस, प्रशासकीय व सैन्यदलातील (कोल्हापूर युनिट) जवानांमार्फत शहीद भागवत बागडे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी विविध मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.यानंतर सैन्यदलामार्फत शहीद भागवत यांच्या पत्नी, आई व मुलांच्या हातामध्ये राष्ट्रध्वज देण्यात आला. यावेळी सैन्यदलामार्फत बंदुकीच्या हवेत तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर लहान मुलाच्या व भावाच्या हस्ते शहीद जवान भागवत बागडे यांना अग्नी देण्यात आली. यावेळी पोलिस उपअधीक्षक यशवंत काळे, पोलिस निरीक्षक यशवंत शिर्के, प्रांताधिकारी कांबळे, तहसीलदार प्रियांका पवार, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे, मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिन सुधाकर कुबेर, कल्पनामोरे, सरपंच गोकुळा तुपे, उपसरपंच हणमंत भोसले, सैनिक स्कूलचे व्ही. ए. जगदाळे उपस्थित होते. (वार्ताहर)आक्रोश पाहून अनेकांचे डोळे पाणावलेशहीद जवान भागवत बागडे यांचे पार्थिव धोंडेवाडीत आल्यानंतर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. अंत्यदर्शन घेतल्यानंतर गावातून पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. शेवटच्या क्षणी भागवत बागडे यांचा तीन वर्षांचा चिरंजीव हर्ष याने पार्थिवाकडे बघून ‘मम्मी पप्पा बघ...’ असे उद्गार काढले. हे शब्द ऐकून उपस्थित सर्वांचेच डोळे अश्रंूनी पाणावले. बागडे यांच्या कुटुंबीयांनी केलेला आक्राश पाहून अनेकांच्या अश्रूंना वाट मोकळी झाली.
शहीद जवान बागडे यांना अखेरचा निरोप
By admin | Published: April 12, 2017 12:36 AM